कॉलेजच्या पहिल्याच वर्षात अनेक कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे सिद्धीची अनेकांशी ओळख झाली होती. काही दिवसांनी तिचा एक ग्रुपच तयार झाला. त्या ग्रुपमध्येच तिची सौरभशी चांगली मैत्री जुळली. अनेकदा दोघांची मतं एक असायची. कॉलेजमध्ये अभ्यास, प्रोजेक्ट्स असो वा घरचा काही कार्यक्रम दोघं अगदी एकमेकांना चांगली कंपनी द्यायचे. एकमेकांच्या चूका सावरणं, चांगलं काय वाईट काय याची ओळख करून देणं. एकूणच दोघांमध्ये एक चांगला बॉण्ड होता. पण कॉलेजच्याच नृत्य स्पर्धेत भाग घेतांना सौरभची ओळख जान्हवीशी झाली. तिच्याबरोबर डान्सची प्रॅक्टीस करता करता सौरभ तिच्या प्रेमात पडला होता. त्यामुळे सिद्धीशी वरवर बोलून तो पुन्हा जान्हवीबरोबर तास तास गप्पा मारत बसायचा. सिद्धी कधी तिथे आली काय आणि गेली काय! याचं त्याला भान राहायचं नाही.
सिद्धीने सौरभला गप्पा मारण्यासाठी किंवा काही कामासाठी बोलवलं, तरी सौरभ काम आहे किंवा आज जमणार नाही असं सांगायचा. सिद्धीचा त्याच्यावर विश्वास होता पण जान्हवीच्या येण्यामुळे तो सिद्धीकडे दुर्लक्ष करत होता. सिद्धीला बँकेत जायचं होतं पण सौरभ कामात असल्याचा बहाणा दिल्याने ती एकटीच कॉलेजमधून बँकेत जात होती. तेवढ्यात रस्त्यात तिला सौरभ आणि जान्हवी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेले दिसले. तिला हे बघून तिचं रडू आवरेनासं झालं. सौरभ तिच्याशी खोटं बोलला होता. तिने दुर्लक्ष करून बँकेचा रस्ता गाठायचा ठरवला. सौरभने सिद्धीला बघितलं होतं पण त्याने तिला हाक मारली नाही. बँकेतून पुन्हा परतताना जान्हवीनेच सौरभला सांगितलं अरे! ती बघ तुझी मैत्रीण. जान्हवीला सिद्धी आवडत नव्हती तरीही मुद्दाम जान्हवीने ए.... सिद्धी म्हणत तिला आपल्या जवळ बोलावून घेतलं.
सौरभ काही ही बोलला नाही न सिद्धीने त्याला काही विचारलं. ती जान्हवीशी वरवर बोलून तिथून निघून गेली. सौरभ आपल्या वागण्याचा विचार करत होता. सिद्धी आपली चांगली मैत्रीण आहे. जान्हवीची आणि आपली अनेकदा भांडणं होतात. तिच्या सतत मागे मागे रहावं लागतं. पण सिद्धी समजूतदार आहे. आपल्या वागण्याला आणि जान्हवीवरच्या प्रेमाला ती समजून घेईल असं त्याला वाटलं. सिद्धी पहिल्यांदा कोणाच्या प्रेमात पडली असेल तर सौरभच्या पण ते प्रेम फुलण्याआधीच कोमेजून गेलं होतं. आता त्याच्यात आणि आपल्यात पूर्वीसारखा बॉण्ड ही राहिलेला नाही असं ती स्वतःच्या मनाला समजावत होती. जवळजवळ दोनतीन महिने झाले सिद्धी सौरभला टाळत होती. आणि दुसरीकडे जान्हवीच्या प्रेमात आकंठ बुडालेला सौरभ जान्हवीला इतर कोणासाठी आपलं नातं तोडू नकोस अशा विनवण्या करत होता. पण अखेर जान्हवी त्याला सोडून गेली. आणि सौरभ एकटा पडला. एवढा एकटा!की त्याच्याकडे आता आपल्या मनातलं बोलण्यासाठी कोणीही नव्हतं. सिद्धीही नाही. त्याने सिद्धीला न राहून अनेकदा कॉल केले पण तिचा पुन्हा कॉल आला नाही.
अखेर सौरभ सिद्धीच्या घरी गेला. सौरभचा त्रासलेला चेहरा, रडून रडून पूर्णपणे लालबुंद झालेले डोळे सिध्दीने पाहिले. या अवस्थेत बघून तिने त्याला घरात घेतलं आणि पाणी दिलं. त्याची ही अवस्था बघता तिने न राहून त्याला विचारलं. त्याच्याबरोबर जान्हवीने प्रेमाचा कसा खेळ केला हे त्याने तिला सांगितलं. त्यादिवशी सिद्धीने मनात त्यांच्याविषयी कुठल्याही प्रकारे राग न ठेवता त्याची समजूत काढली. सौरभला जेव्हा जेव्हा कॉलेज मध्ये जान्हवीची आठवण यायची तेव्हा तेंव्हा त्याचा स्वतःच्या मनावरचा ताबा सुटायचा पण सिद्धी त्याला योग्यपणे समजावून पुन्हा शुद्धीवर आणायची. हे पाहून सौरभच्याही मनात सिद्धीला दिलेल्या वागणुकीबद्दल अपराधी भावना तयार झाली होती. तो अनेकदा तिची माफी मागायचा आणि तिने त्याच्यावरच्या प्रेमामुळे त्याला कधीच माफही केलं होतं.
जवळजवळ एक वर्ष सिद्धी सौरभला सावरत होती. सौरभला त्याची जाणीव होती. एकदा सिद्धीबरोबर असतानाच सौरभ ने तिला तुझं माझ्यावर प्रेम आहे? असा प्रश्न केला. त्यावर सिद्धीला मी काय बोलू असं झालं होतं. मला माफ कर मी तुझं प्रेम कधीच समजू शकलो नाही. जान्हवीच्या अकर्षणाला भुलत गेलो पण आता मी जो आहे तो फक्त तुझ्यामुळे आहे. तू मला या दुःखातून बाहेर काढलंस. मला तुझं प्रेम कळलं नाही पण या दिवसांमध्ये मला त्याची जाणीव झाली आहे. आणि आता मला तुला गमवायचं नाही. आय लव यु! या शब्दांनी सिद्धी सुन्न झाली. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू टपटपू लागले. एवढ्या प्रतिक्षेनंतर तो क्षण अखेर समोर उभा होता. तिने लाजत मानेने होकार दिला. दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत सुरू झालेल्या नवीन नात्याची स्वप्ने पाहण्यात गुंग झाली.
0 टिप्पण्या