मनीषाच्या बहिणेचे एका  मुलासोबत प्रेम झालं आणि काही काळाने दोघांची ताटातूट झाली. त्या आधीचं थोडं सुख आणि नंतरचं दुःख भारी. हे सर्व चित्र मनिषाने  तिच्या मोठ्या बहिणीच्या बाबत पाहिलं होतं. म्हणून प्रेमाच्या फंद्यात पडायचं नाही हे तर तिने ठरवून ठेवलं होतं. पण म्हणतात ना ज्या गोष्टीपासून आपण चार पावलं लांब पळत असतो तीच गोष्ट आपल्या मागोमाग येत असते. मनिषाने बारावीनंतर दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. सगळं सुरळीत तिच्या मनाप्रमाणे चाललेलं होत. पण तिच्याकडे एका मुलाने आपल्या प्रेमाची कबुली दिली. ती त्याला सरळ म्हणाली, "हे बघ! माझ्यापासून लांब रहा. सारखा माझा पाठलाग करू नकोस! प्रेमाच्या फंद्यात पडणारी मी नाही. काही दिवस असेच गेले. तिचं मन आज वळेल, उद्या वळेल असं करत त्या मुलाचे प्रयत्न चालू होते. मनीषाला त्याच्या प्रत्येक कृतीची जाणीव होती. वयाप्रमाणे इतर प्रेमींना बघून तिच्याही अनेकदा मनात प्रेमाविषयीची ओढ निर्माण व्हायची. त्यात तिच्यावर प्रेम करणाऱ्या मुलाविषयी तिच्या मनातही प्रेम उमलत होतं. पण तिला तिच्या बहिणीचे प्रेमात पडल्यापासून, त्यांच्यातल्या छोट्यामोठ्या कुरबुरी पासून ते अखेर नातं तुटेपर्यंत आणि त्यानंतरचा बहिणीला होणारा त्रास हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं, अनुभवलं होतं. म्हणून हे सगळं आठवलं की तिला प्रेमाविषयी भीतीच वाटायची.







मनीषाच्या मैत्रिणी त्या मुलाच्या नावानेही चिडवू लागल्या होत्या. एकदा तिच्या मैत्रिणीने तिला एकांतात समजवण्याचा प्रयत्न केला. तिने मनीषाला प्रेमाविषयी एवढा राग, गैरसमज का असं म्हंटल्यावर मनीषा म्हणाली, "मला भीती वाटते प्रेमात पडण्याची. प्रेमात माणसाचं काय काय होतं हे मी पाहिलंय.  सुरुवातीला सर्व गोष्टी छानच घडणार आहेत असं वाटतं. पण समोरच्या व्यक्तीला आपला कंटाळा आला, की तो मग दुसऱ्या प्रेमाच्या शोधात असतो. म्हणून आपणचं आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे असं होतं. ज्या व्यक्तीवर आपला सर्वात जास्त विश्वास असतो तोच व्यक्ती आपला विश्वासघात करतो. आपण एकटे पडतो. प्रेमाचा हा झटका एवढा प्रभावी असतो, की त्यातून त्या माणसाला सावरताना काय होतं हे सगळं मला ठाऊक आहे. त्यात ते प्रेम सफल होईल की नाही याची रोज धाकधूक मनात असते. बरं ते प्रेम सफल झालं तर ठीक, नाहीतर त्याच व्यक्तीविषयी सतत आपलं मन झुरत राहणार.... नको हा प्रेमाचा त्रास.

तिच्या मैत्रिणीने प्रेमाविषयीच्या चुकीच्या समजुतीतून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ती तिला म्हणाली, "एक अनुभव वाईट आला म्हणून प्रेम वाईटच असतं असं नाही ना! मान्य आहे, प्रेमात भांडणं होतात कुरबुरी होतात पण हे सगळं ही त्या दोन माणसांच्या प्रवृत्तीमुळे घडतं. त्या व्यक्तीने आपला विश्वास तोडू नये, प्रेमात येणारी प्रलोभनं किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होणं हे सगळं त्या व्यक्तीच्या विचारांनी घडतं. पण जर प्रेमाच्या नात्याला एकमेकांच्या साथीने दोघेही घट्ट धरून असू, तर ते नातं सफल होतंच. भांडणं झाली तरी त्या भांडणातून निर्माण होणारा दुरावा हा काही जास्त वेळ टिकणारा नसतो. मनातल्या मनात दोघांनाही एकमेकांशी बोलावं, भेटावं ही ओढ असते. एवढंच की ते भांडण जास्त काळ ताणू नये. आणि प्रेमात सतत एकालाच पडती बाजू घेऊन ते नातं टिकवत राहावं अशी ही वेळ येऊ द्यायची नाही. प्रेमात दोघांच्या परड्या समान असायला हव्यात. प्रेमाची अनेक चुकीची उदाहरण तुझ्यासमोर आली असतील. पण तितकीच प्रेमाची आज समाजात चांगली उदाहरणं आहेत. आज अनेक प्रेमी वाटेल ते करायला तयार असतात.  मोठं मोठे करोडपती आपल्या प्रेमाला जिंकण्यासाठी अक्षरशः एका झोपडीत राहतात. प्रेमाची ताकद खूप मोठी असते. प्रेमात जेवढा त्रास सहन करावा लागतो असं तू म्हणतेस ना, तेवढंच त्या त्या व्यक्तीकडून आपल्याला प्रेमही भरभरून मिळतं. ते नातं कसं जोपासायचं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. म्हणून म्हणतेय! की प्रेम काही घाबरण्याची गोष्ट थोडीच आहे. तो तर एक प्रवास आहे जिथे त्या व्यक्तीच्या सहवासात आपल्याला चांगला आणि वाईट या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेता येतो. त्यातली चांगली बाजूची झळ जशी दोघांना लागते तशी त्यातल्या वाईटासाठीही एकट्याने सामोरे न जाता, दोघांनी त्याचा सामना करायला हवा. प्रेमातलं ते समरस होणं म्हणजे काय असतं, याची जाणीव आपल्याला होते. हे सगळं मनीषाही शांतपणे ऐकत होती. प्रेमाविषयी तिच्या समोर, घडलेलं अंतिम सत्य आहे असं तिला वाटत होतं. पण तिने जसं तिची मैत्रीण सांगत होती तशी अनेक प्रेमी जोडप्याविषयी प्रेमाची एक चांगली बाजू बघितली होती. मैत्रिणीचा हात हातात घेत मनीषा तिला थँक्स म्हणाली. मैत्रीण तिच्याकडे बघून हसत म्हणाली, "तो बघ अजून तिथेच उभा आहे! काय मग सांगू का त्याला....?" हे ऐकून मनिषाने तिला हसत हसत एक फटका मारला. प्रेमाची चांगली बाजू असते हे मनीषाला पटेनासचं झालं होतं. पण आता मात्र मैत्रिणीमुळे तिला चांगल्या आणि वाईट या दोन्ही बाजू लक्षात आल्या होत्या. नकळत का होईना बहिणीने तिच्या नात्यात केलेल्या चुकाचीही तिने नोंद घेतली. मनीषा तिथेच उभी असताना समोरून येणाऱ्या त्या मुलाला पाहून तिच्या मनात असंख्य फुलपाखरे भिरभिर करू लागली.