तुम्ही पाहिले असेल की मंगळसुत्रात हळद आणि कुंकु भरलेलं असतं. त्यातही खास गोष्ट आहे ती म्हणजे माहेरच्या वाटीत हळद तर सासरच्या वाटीत कुंकू भरले जाते. त्यानंतर कुलदेवीचे स्मरण करून मंगळसुत्राची पूजा करतात आणि मग ते वधुच्या गळ्यात घालतात. मंगळसूत्राची लांबी पोटापर्यंत असावी. येथे अनाहत चक्राचे स्थान असते. मंगळसूत्राच्या वाट्या त्या अनाहत चक्राला स्पर्श झाल्या पाहिजे. यामुळे स्त्रियांचे मन आणि चित्त शांत राहते. त्या चक्रांमधून स्त्रीला आत्मिक शक्ती मिळते आणि त्याचा प्रभाव संपूर्ण घरावर पडतो. मंगळसूत्र अनेक राज्यांत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते परंतु त्याचे महत्त्व सगळीकडे सारखे आहे.
तामिळनाडू आणि केरळ या प्रदेशात 'ताळी' नावाचा एक सौभाग्य अलंकार वधूच्या गळ्यात बांधण्याचा प्रघात आहे. त्यावरूनच 'मंगळसूत्र' बांधण्याची प्रथा सुरू झाली असावी असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मंगळसूत्र सातवाहन काळापासून प्रचलित आहे. तेव्हा ‘कनकदोर’ आणि ‘कनकसर’ अशी नावं त्याला होती. पुढे यादव काळात ते ‘कनकसूत्र’ किंवा ‘हेमसूत्र’ नावाने प्रचलित झालं आणि नंतर त्याचं नामकरण ‘साज’ असं झालं. ज्यात कोल्हापुरी साज हा खूप लोकप्रिय झाला. त्यात मासा, कमळ, चंद्र, शंख, नाग, कासव, भुंगा अशी पदकं समोरासमोर जोडली गेली. मध्यभागी एक लोलक बसवण्यात आला. त्यामुळे त्याला ‘पानडी’ असंही म्हटलं जायचं. हे संपूर्ण सोन्याचं असायचं. मात्र दिवसेंदिवस सोन्याची किंमत वाढतच गेली. त्यामुळे निव्वळ सोन्याची जागा काळ्या मण्यांनी घेतली. हळूहळू या मंगळसूत्रात विविध प्रकार आले त्यानुसार त्याला अंबरसा, आयतोळी, कंठा, गोफ, गाठले, पेंडे, पोवते, पोत, गुंठण, डोरले असेही शब्द ग्रामीण भागात रूढ आहेत. मंगळसूत्राला स्त्रीधन असेही म्हणतात. आपल्या पुराणात अनेक पतीव्रता महिलांच्या कथा सांगितल्या जातात.
"नको मज बिंदी, नको चंद्रहार। पुरे एक अलंकार, मंगळसूत्र।।"
गळ्यात मंगळसूत्र, गळा दिसे तालेदार। कंठ तुझा सुभेदार।।"
असे आपल्याकडे म्हटले जाते.
आपल्या संस्कृतीत म्हणा किंवा लोकपरंपरेने स्त्रीची प्रतिमा पतीच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी अशी रेखाटली आहे. कुंकू, चुडा याप्रमाणे मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतिके असून ते घालून पतीला दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना पत्नी सदैव करत असते.
0 टिप्पण्या