हनिमून .... म्हटलं की लगेच गालावरची कळी खुलते. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस हे कुठल्याही नव परिणीत जोडप्यासाठी एक आयुष्यभराचा ठेवा असतो. म्हणून हे दिवस अविस्मरणीय होण्यासाठी या मधुचंद्राची संकल्पना पुढे आली. हे जोडपं आधीपासून एकमेकांना ओळखणारं असू देत की अगदीच अपरिचित असू देत, एकमेकांसोबत आयुष्याची सुरुवात करण्याआधी एकमेकांच्या सहवासात क़्वलिटी टाईम व्यतीत करण्यासाठी त्यांना हनीमून हा चांगला पर्याय आहे. पण आता लग्नातच एवढा खर्च झालेला असतो म्हणून एकदमच स्वित्झर्लंड, पॅरिस, वेनिस वगैरे ठिकाणी जाणं परवडणारं नसतं. म्हणूनच छोट्या बजेटमध्ये ही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेता येऊ शकतो. आपल्या देशातील अशी काही ३ ठिकाणं मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये आणि निसर्गाचा छान आस्वाद घेत आपलं हनिमून छान इन्जॉय करू शकाल..






कूर्ग -

कर्नाटक राज्यातल्या कूर्ग या शहराला "भारताचं स्कॉटलंड" असं म्हटलं जातं. त्याच बरोबर त्याला "कर्नाटकचं काश्मीर" असं ही म्हणतात. हिरव्यागार उंचच उंच डोंगररांगा हे कूर्गचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक हंगामात कूर्ग हे तितकंच सुंदर दिसतं. पावसाळ्यात मात्र त्याच्या सौंदर्याला चार चाँद लागतात. म्हैसूर पासून १०० कि.मी.अंतरावर निसर्ग सौंदर्यासाठी कूर्ग प्रसिद्ध आहे. प्रदूषण व रहदारीपासून मुक्त असलेल्या कुर्गला भेट दिल्यानंतर मन प्रसन्न होतं. इथे पर्यटन स्थळांना भेट देण्या बरोबरच पर्यटक ट्रेकिंग, कॅम्पिंग, हायकिंग, बोटिंग, रिव्हर राफ्टींग इत्यादी गोष्टी सुद्धा करू शकतात. फळं आणि कॉफीच्या बागा मनाला वेड लावतात. कुर्गमध्ये फिरण्यासारखी जी स्थळे आहेत त्यात सर्वात आधी येतो तो म्हणजे



अब्बे धबधबा -

कॉफीच्या बागांमध्ये आत शिरून लहानशा वाटेने धबधब्याजवळ जावं लागतं. याच वाटेत मसाल्याच्या बऱ्याच बागा आहेत. म्हणून या बागांमधून येणारा मसाल्याचा वास आपलं मन मोहवून जातं. इंग्रजांच्या राजवटीत अब्बे या धबधब्याचे नाव जेस्सी धबधबा असं होतं पण नंतर मडिकेरीच्या इंग्रज अधिकाऱ्याने स्वतःच्या मुलीच्या नावावरून या धबधब्याचं नाव अब्बे फाॅल्स असं ठेवलं.


नामड्रोलिंग बौद्ध मठ -

कुर्गपासून ३४ किमी अंतरावर असलेलं हे नामड्रोलिंग बौद्ध मठ तिथल्या लोकांच्या आस्थेचं केंद्र आहे. या मठात गेलं की बुद्धाच्या मूर्तीच्या बाजूला असलेलं बारीक बारीक नक्षी काम मन वेधून घेतं.


दक्षिण भारतातलं हे एकच बौद्ध संस्कृती आणि वास्तूकलेचं सुंदर उदाहरण आहे. शाक्यमुनी आणि अमितामय यांच्या ४० फुट उंचीच्या सोनेरी रंगातील मूर्ती आहेत. या मठाच्या भिंतींवर तिबेटी पौराणिक कथांमधले अनेक प्रसंग चित्रित केलेले आहेत.


रिव्हर राफ्टींग -

ब्रम्हगिरी पर्वतातून वाहत येणारी बारापोला नदी राफ्टींगसाठी अतिशय योग्य आहे. ज्यांना नदीच्या प्रवाहात स्वतःला झोकून द्यायचं आहे ते लोक याचा पुरेपूर आनंद घेतात.


सोमवार पेठ-

शांत व प्रदूषण मुक्त हवापाणी हे सोमवारपेठचं वैशिष्ठ्य आहे. या जागेवर सेंद्रिय शेती अधिक केली जाते. हळद, आले, कॉफी, वेलची, मसाले यांची मोठ्या प्रमाणात शेती सोमवारपेठेत होते. निसर्गसौंदर्याची आवड असणाऱ्यांनी कूर्गची सफर चुकवू नयेच. इथे दोन ते तीन दिवस सर्व सोयी सुविधांसह राहण्याचा तुमचा खर्च साधारण सतरा हजार होऊ शकतो.


ऊटी -

तमिळनाडू मधलं ऊटी हे शहर शांत आणि प्रदूषण नसलेलं हिलस्टेशन कुठल्याही हनिमून जोडप्यासाठी अतिशय सुंदर ठिकाण. नीलगिरीचे सुंदर डोंगर, चहूबाजूंनी हिरवळ, आकर्षक तलाव ही निसर्गाची किमया भुरळ पाडते.



दोडाबेत्ता शिखर उटी-

दोडाबेत्ता शिखर दक्षिण भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. या पर्वत शिखरावरून उटी परिसर वन निलगिरी पर्वत रांगांचे अत्यंत मनमोहक दृश्य पाहता येते. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण सुंदर आहे.


कलहट्टी धबधबा उटी -

कलहट्टी धबधबा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. कलहट्टी गावापासून २ कि.मी.चे अंतर पार करून या धबधब्याजवळ जाता येते. या ठिकाणी एक मंदिर आहे जिथे ऋषि अगस्त्य रहात होते, असं मानलं जातं.


प्याकारा धबधबा  -

उंचउंच देवदार वृक्षांनी वेढलेला विलोभनीय धबधबा. या धबधब्याला लागून टोडा जातीच्या लोकांच्या वस्त्या आहेत म्हणून तिथून त्यांची संस्कृती व जीवन जवळून अनुभवता येतं.

उटी हे एक प्रसिध्द पर्यटन स्थळ असल्यामुळे इथे वर्षभर पर्यटक भेट देतात, कारण प्रत्येक ऋतूमध्ये उटीचं सौंदर्य तितकंच खुललेलं असतं. इथे पाच ते सहा दिवस राहण्याचा तुमचा खर्च सोळा हजाराच्या आसपास जाऊ शकतो.


उदयपूर -

राजस्थान मधलं तलावांचं शहर अशी ओळख असलेलं असं हे उदयपूर तिथल्या भव्य महाल आणि संग्रहालयांसाठीही ओळखलं जातं. तिथले मोठे किल्ले, वन्यजीव अभयारण्य ही उदयपूरची ओळख आहे. महाराणा उदयसिंह द्वितीय यांनी १५५९ मध्ये या शहराची स्थापना केली होती. संस्कृती आणि परंपरा यांचा योग्य समतोल असलेलं हे शहर. शहरात अनेक किल्ले आहेत; पण इथलं सिटी पॅलेस बघण्यासारखं आहे.


जुन्या मोटारगाड्यांचा संग्रह -

जयपूरच्या सत्ताधीशांनी वापरलेल्या जुन्या गाड्यांचा संग्रह इथे बघण्यासारखा आहे. यात अनेक जुन्या काळातल्या वेगवेगळ्या मोटारी आहेत.


लेक पॅलेस -

पिचोला तलावात बांधलेला हा एक राजवाडा आहे. आज हा राजवाडा ताज ग्रुपने चालवलेलं एक हॉटेल बनलं आहे.


रज्जू मार्ग -

उदयपुर मधल्या एका टेकडीवरील करणी माता मंदिर इथे जाण्यासाठी रज्जू मार्ग बनवला गेला आहे. इथे उभं राहून पाहिलं तर संपूर्ण उदयपूर नजरेच्या टप्प्यात येतं.


सिटी पॅलेस -

एकूणच उदयपूरच्या राजघराण्याचा पिचोला तलावाशेजारी असणारा हा राजवाडा आहे. या राजवाड्यात विविध शैलीत बांधकाम केलेले दिसून येते. उदयपूरच्या गादीवर अनेक राजांनी आपापल्या राज्यात काही न काही बांधकाम केलं आहे. त्यामुळे विविध शैलीमध्ये झालेलं बांधकाम इथे दिसते. इथे तीन दिवस राहण्याचा तुमचा खर्च नऊ हजाराच्या आसपास जाऊ शकतो.


तर, ही आहेत आपल्या देशातील अशी तीन ठिकाणं जिथे तुम्ही कमी बजेट मध्ये तुमचा हनिमून मस्त इन्जॉय करू शकता. तुम्हाला कुठल्या ठिकाणी जायला आवडेल नक्की सांगा. हॅपी हनिमून........…