कहाणी दुर्दैवी बापाची.
मी कामावर जात असताना रोज मला रस्त्याच्या कडेला एक वेडसर भिकारी बसलेला दिसायचा.आजही मला तो त्याच जागी दिसला.त्याची अवस्था खूपच दयनीय होती.त्याने फाटके कपडे घातलेले होते,कपडे कसले त्यातर फक्त चिंद्या होत्या. एखादा शेतकरी बुजगावण्याला जे कपडे अडकवतो त्यापेक्षाही बेकार अवस्था त्याच्या कपड्याची होती.त्याचे केस आणि दाढी खूपच वाढली होती आणि अंग मळकटलेले होते.
माझ्या मनात विचार आला कि,
'हा कोण असेल? आणि असा का बसलेला असतो हा रस्त्याच्या कडेला?'
पण कामावर जायची घाई असल्यामुळे मी तसाच पुढे गेलो.
पण मनातून त्याचा विचार काही जातं नव्हता.
मला तो दररोज दिसायचा आणि मी त्याला पाहिल्याशिवाय पुढे जात नव्हतो.
जणू त्याच्यात आणि माझ्यात काहीतरी नातं निर्माण झाल्यासारख वाटत होतं.
असाच एकेदिवशी मला तो तिथं दिसला नाही,त्यामुळे माझं मन सैरभैर झालं आणि मी त्याला इकडे तिकडे सगळीकडे शोधु लागलो.पण हा काय दिसला नाही.
मी आजूबाजूच्या लोकांकडे त्याची चौकशी केली तर समजलं की,महानगरपालिकेने त्याला आरोग्य तपासणीसाठी नेला आहे.मी महानगरपालिकेच्या रुग्णालयात गेलो आणि त्याची चौकशी केली.तेव्हा डॉक्टरांनी मला म्हणाले की,
"याचा स्मृतीभ्रंश झाला आहे आणि त्यामुळे याची स्मृती येत जातं राहते.पण कधी येईल कधी जाईल हे सांगता येणार नाही."
डॉक्टरांनी हे जेव्हा मला हे सांगितलं तेव्हा मला माझ्या स्वर्गीय आजोबांची आठवण आली.त्यांचापण अधुनमधून स्मृतीभ्रंश होत होता. त्यामुळे ते घर आणि रस्ता भटकायचे.
पण पंचक्रोशीत त्यांना सगळे ओळखत असल्यामुळे ते आम्हाला फोन करून सांगायचे की आजोबा या ठिकाणी आहेत.मग हातातलं काम आहे तिथं टाकून, प्रसंगी समोर वाढलेलं जेवणाचं ताट बाजूला सारून आम्ही त्यांना आणायला जायचो.त्या आठवणीमुळे तो माणूस आणखी जवळचा वाटु लागला.
आणि मग मी मनात ठरवलं की,
'त्याच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे.'
सुट्टीदिवशी मी माझ्या मित्राला बरोबर घेतलं आणि जेव, नवे कपडे आणि एका न्हाव्याला बरोबर घेवून त्या ठिकाणी पोहोचलो.तो नेहमीच्या जागीच बसला होता आणि येणाजाणाऱ्या वाहनांकडे बघत होता.आम्ही त्याच्या जवळ गेलो तर तो आम्हाला घाबरून दूर पळू लागला.
आम्ही त्याला पकडून त्याच्या अंगावर पाणी ओतलं आणि न्हाव्याने त्याचे केस आणि दाढी कापली. मग त्याला अंघोळ घालून आम्ही त्याला नवीन कपडे घातले. काय चालु आहे हे त्याला काहीच कळत नव्हतं.
तो फक्त बावरून इकडेतिकडे बघत होता.मी त्याच्याशी संवाद साधायचा म्हणून विचारलं,
"बाबा तुमचं नाव काय आहे? घर कुठे आहे तुमचं?"
पण तो फक्त माझ्याकडे फक्त निरागस नजरेने बघत होता.मग मी जेवण आणलेलं त्याला खायला दिलं.पण तो घेत नव्हता,मी त्याच्या हातावर ठेवून दिलं तरी तो घाबरत होता. कदाचित त्याला जेवणावरुन कोणीतरी मारहाण केली असावी,म्हणून तो घाबरत होता. आम्ही जेवण तिथं ठेवून थोडसं बाजुला गेलो. त्याने थोडं इकडेतिकडे बघितलं आणि थरथरत्या हाताने तो घास तोंडात घालु लागला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.ते दृश्य बघून नकळत माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आणि हुंदका दाटून आला.
वातावरण खूपच भावूक झालं म्हणून मित्र म्हणाला,
"अरे रडतो काय वेड्या?तु एक पुण्याचं काम केलं आहेस,चल आता जरासा हस पाहू."
मग एक हास्याची लकेर माझ्या चेहऱ्यावर उमटली आणि आम्ही तिथून परतलो.पण रात्री झोपल्यावर मनात विचार आला की,'
तो बिचारा कुठे झोपत असेल? त्याला पांघरूण असेल ना?'
मी तसाच उठलो, एक चादर घेतली आणि खोलीला कुलूप लावून बाईकवरुन तो जिथे बसायचा तिथे आलो.तर तो थंडीने कुडकुडत बसला होता.
मी त्याच्या अंगावर चादर घातली आणि परत खोलीवर आलो. मला त्याच्यासाठी करेल तेवढं कमीच वाटत होतं.
मग मी मनाशी ठरवलं की,त्याला दररोजचं जेवण आणि त्याला काय हवं नको ते सगळं आपण पुरवायचं.कारण त्याच्या रूपात कुठेतरी मला माझे आजोबाच दिसत होते.
असेच दिवस पुढे ढकलत होते आणि त्यालापण आता मी आपला वाटु लागलो होतो. तो माझी वाट पाहत बसायचा आणि मी आलो की त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसायचा.
एके दिवशी अशी एक गोष्ट घडली,ज्याची मी कल्पना केली नव्हती.
तो चक्क माझ्याशी बोलला होता त्यामुळे माझा आनंद गगनात मावत नव्हता. कारण डॉक्टर बोलले होते तसच झालं होतं.
मी त्याला जेवण घेऊन गेलो तेव्हा तो म्हणाला,
"बाळ एवढं का करतोयस माझ्यासारख्या भिकाऱ्यासाठी?"
मी म्हणालो,
"बाबा!मी हे का करतोय हे मला माहीत नाही पण मला तुमच्याबद्दल आपुलकी वाटते."
यावर तो बोलला,
"बाळा या जगात कोणी कोणाचं नसतं,आपली रक्ताची नातीच आपली वैरी होतात. त्यांना आपल्याच माणसांचं ओझं वाटू लागतं.मग तुझं माझं काय नातं आहे?"
मी अचंबित झालो कारण तो एकदम तत्वज्ञानी वाटावा असच बोलत होता.
मी म्हणालो,
"बाबा!मला खरं सांग.तु कोण आहेस?तु भिकारी नाहीस.मला तु कोणत्यातरी चांगल्या घरातला असल्यासारखा वाटतं आहेस."
तो मिश्किलपणे हसत म्हणाला,
"सगळी घर चांगलीच असतात बाळा. वाईट असतात ती माणसं. या स्वार्थीवृतीच्या जगात चांगली माणसं भेटणं दुर्मिळ झालं आहे.मला चांगली माणसं भेटली असती तर असा खितपत पडलो नसतो."
नक्कीच त्याच्याबरोबर काहीतरी वाईट घडलं होतं याची मला जाणीव झाली.
मी त्याला विचारलं,
"बाबा काय झालं मला सांगशील का? मी तुझ्यासोबत आहे. तुला कधीच एकटा सोडणार नाही."
माझा कळवळा बघून तो सांगु लागला.
तो म्हणाला,
"बाळ मलापण परिवार आहे,पोरबाळ आहेत ,नातवंड आहेत. मी एका खाजगी कारखान्यात नोकरीवर होतो. जोपर्यंत पैसा मिळवत होतो तोपर्यंत मी सगळ्यांनाच हवा होतो.नंतर मी निवृत्त झालो.आयुष्यभराची पुंजी मुलांसाठी खर्ची घातली. स्वतःजवळ काहीच बाकी ठेवलं नाही. कारण मला माझ्या मुलांबाळावर ठाम विश्वास होता. काही काळानंतर मला स्मृतीभ्रंश होण्याचा आजार जडला आणि मी अधूनमधून सगळच विसरु लागलो. इकडे तिकडे भटकायचो. मला कोणीच ओळखायचं नाही.बायको होती तोवर माझं सगळं तीच बघत होती,पण एकेदिवशी ती हे जग सोडुन गेली.त्यानंतर मी माझ्याच पोटच्या पोरांना नकोसा झालो. बाबा असाच करतो,बाबा तसाच करतो,रात्री कशाला खोकतो? आमची झोप मोड होते, कुठे जाऊन मरत का नाही? आणि बरच काही जे ऐकून माझ्या काळजात भोक पडत होती.
पण म्हातारं झाड म्हणून ऐकून घेण्याशिवाय हातात काय नव्हतं.एक दिवस असाच सगळं विसरून भरकटत एका रेल्वेच्या डब्यात शिरलो आणि ती रेल्वे मला इथं घेऊन आली.आता हेच माझं घर, हे अवघं जगच माझं कुटुंब. इथंपण माणसं त्रास देतात,शिव्या देतात,मारहाण करतात, पण एक गोष्ट सुखावून जाते ती म्हणजे ती उघडउघड परकी माणस असतात.ती माझ्या रक्ताच्या नात्यातली नसतात.
रोज आपल्या कुटुंबासाठी रस्त्यावरून धावणारी माणसं मी बघत असतो आणि मला माझ्या तरुणपणाची आठवण येते. तेव्हा हे म्हातारपण जास्तच बेकार वाटायला लागतं.बायकोने जाताना जीवाचं काही बरवाईट करु नको,असं बजावलं आहे.म्हणून जगतोय बघ बाळा.
इतकी वर्षे झाली माझ्या पोरांनी मी कुठं आहे? जगलो कि मेलोय?हे बघितलं पण नसणार हे मला माहीत आहे आणि मलासुद्धा त्या स्वार्थी जगात परत जायची इच्छा उरली नाही.
माझा माणुसकीवरचा विश्वासच उठला होता,पण बाळा तुझ्याकडं पाहिलं आणि या जगात अजुन माणुसकी आहे हे मला पटलं.तुझे आईवडील खुप नशीबवान आहेत बाळा.
काही नात नसताना तु मला किती जीव लावतोस. तुला उभ्या आयुष्यात काही कमी पडायचं नाही.बाळा माझा आशीर्वाद आहे तुला."
आता तो रडू लागला,मी त्याला आधार दिला आणि बाटलीतलं पाणी पाजलं. त्याची व्यथा ऐकुन माझ्या डोळ्यातुन नकळत पाणी वाहू लागलं आणि त्याच्या मुलांबद्दल खुप चीड आली.
मी स्वतःला सावरलं आणि तिथून निघून गेलो,खोलीवर गेल्यावर मला आई बाबांची खुप आठवण येत होती.मग मी गावाकडे फोन लावला आणि त्यांना ही सगळी हकीकत सांगून खुप रडलो.आई बाबांनी मला समजावल्या नंतर बर वाटू लागलं.
मी त्याच्याकडे खुपवेळा त्याच्या मुलांचा पत्ता मागितला,पण तो नेहमीच लक्षात नाही म्हणून टाळत होता.
असेच दिवस जात होते आणि पूर्ण जिल्ह्यात तेव्हा एका विशिष्ट जमातीतील चोर सगळ्या जिल्ह्यात पसरले असल्याची अफवा पसरली होती. सगळीकडे या अफवांनी धुमाकूळ घातला होता,सगळ्यांची भीतीने गाळण उडाली होती. कोणतीही अनोळखी व्यक्ती दिसली की तिला चोर म्हणून संशयाने बघितलं जाऊ लागलं आणि कसुन चौकशी करण्यात येत होती.
नेहमीप्रमाणे मी त्यादिवशीही कामावर जात होतो, तेव्हा एका ठिकाणी खुप जमाव जमलेला दिसला. त्या घोळक्यात काहीतरी होतं,ते सगळे जाऊन बघत होते. मीपण बाईक बाजूला घेतली आणि वाट काढत तिथे पोहोचलो आणि ते दृष्य बघुन मला जबरदस्त धक्काच बसला. मी मटकन खाली बसलो.
लोक आपाआपसात बोलत होते,
"हा चोर होता,भिकाऱ्याचं सोंग घेवून बसला होता.नाव गाव विचारलं तर काय सांगत नव्हता.म्हणून आम्ही जरा दरडावुन विचारलं तर पळायला लागला.मग सगळ्यांनी पाठलाग करून मारला.मेला ते बरंच झालं,चोरांना असंच मारायला पाहिजे. उद्या याने आपल्या घरात शिरून चोरी करायला कमी केली नसती."
माझं डोकं बधिर झालं होतं,चक्कर आल्यासारखं वाटतं होतं.एवढ्यात घटनास्थळी पोलीस आलेत,त्यांनी गर्दी पांगविण्यासाठी लाठीमार चालु केला.मलापण एक दोन काठ्या बसल्या आणि मी भानावर आलो.
मला बाजुला घालवण्यात आलं आणि पंचनामा करून त्याचा मृतदेह बेवारस या नावाखाली शवाहिकेतून नेण्यात आला. मी फक्त बघत होतो,कारण मला समोरच्या दृश्यावर विश्वास बसला नव्हता. मी बराच वेळ तिथ स्तब्धपणे बसून होतो.मग कामावरून मित्राचा फोन आला मी त्याला म्हणालो,
"माझी तब्येत बरी नाही आणि मी इथं रस्त्यावर आहे.मला खोलीवर सोडायला ये."
तो मला खोलीवर घेवून गेला आणि मी त्याच्या गळ्यात पडुन ओक्साबोक्सी रडलो.
खुप वाईट वाटतं होतं आणि मनात प्रश्न पडला होता.
की काय चुकी होती त्याची?
कसाबसा देवाच्या फोटोसमोर उभा राहीलो आणि देवाला म्हणालो,
"का?का असा निष्ठुर बनला आहेस? का त्याच्या जीवाशी खेळ केलास? त्याला असाच मारायचा होता तर एवढे दिवस त्याला का मरणयातना दिल्यास?
आणि ज्यांनी विनाकारण त्याला जीवानिशी मारलं,त्यांना कोणी अधिकार दिला त्याला मारायचा? ज्यावेळी तो रस्त्याच्या कडेला उपाशीपोटी मरत मरत जगत होता,थंडीने कुडकुडत होता,भरपावसात भिजत होता तेव्हा कोणालाही त्याची दयामाया आली नाही.त्याला काय हवं?काय नको? हे बघायला कोणालाही वेळ नव्हता. मग आज त्याला चोर ठरवून,त्याला मारुन जे लोक पुरुषार्थ मिरवत होते ते खरच पुरुष होते का? एका म्हाताऱ्या माणसाला त्याच्याच मुलांनी आता आपल्याला काही उपयोग नाही म्हणून घरातून हाकलून लावलं आहे,त्यात भर म्हणजे त्याला स्मृतिभ्रंश झाला.हाच त्याचा दोष आहे काय?
तो पण एक तुमच्या आमच्यासारखा जीव होता ना? त्यालापण वेदना झाल्या असतील ना? मार खात असताना त्यालापण वाटलं असेल की, या लांडग्यांच्या कळपातून सुटका करून घ्यावी.पण हजारो लांडग्यांच्यासमोर त्या बापड्या म्हाताऱ्याचा निभाव कसा लागणार होता? जीव जाताना त्याला आपल्या माणसांची आठवण झाली असेल का? पण त्याचं आपलं खरंच कोणी होतं तरी का? त्या हजारोंच्या गर्दीत एकपण माणूस असा नव्हता का,ज्याला त्याची दया आली असेल? त्याने जीवंतपणी मरणयातना भोगल्या,पण कोणाला कधी त्रास दिला नाही. आजवर त्याने कधी एका भाकरीचा तुकडाही चोरला नव्हता.अशा माणसाचा शेवट चोर म्हणून व्हावा यासारख दुर्दैव नसावं.पण जी गर्दी त्याला हकनाक मारुन गेली त्यांना त्याचं काय घेणंदेणं?ती गर्दी घरी गेली असेल आणि सगळं विसरली देखील असेल. पण त्या निष्पाप जीवाचा ज्या पद्धतीने अंत झाला ती अत्यंत अमानुष होती.त्या गर्दीला कोणी जाब विचारणार का? त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळणार का? "
मला माहीत होतं,देवाकडेपण याचं उत्तर नसणार आहे.
मी नंतर गावी फोन केला आणि आईशी बोलून ढसाढसा रडलो.तिकडे आईचापण बांध फुटला आणि दोघंपण रडू लागलो.
त्यादिवशी मी न जेवताच झोपलो.
दुसऱ्या सकाळी रोजच्याप्रमाणे मी कामावर निघालो आणि तो जिथं बसायचा त्याजागी जाऊन त्याला इकडेतिकडे शोधु लागलो. मला माहीत होतं कि तो कुठेच नाही. तरीपण एक वेडी आशा होती.मग भानावर आलो आणि मी त्याचं जेवण त्याच जाग्यावर ठेवून पुढे चाललो.थोड पुढे जाऊन मी मागे वळून पाहिलं,तर एक कावळा तिथं अन्न चोचीत धरुन खाऊ लागला होता.मला असं वाटलं कि जणू तो कावळ्याच्या रुपात तिथं येवुन बसला आहे. मी आजही तिथं थोडफार जेवण ठेवत असतो आणि तो कावळा येऊन ते खात असतो.माणूस संपला तरी त्याच्या आठवणी संपत नसतात. आजही त्याचा तो निष्पाप चेहरा आणि ते निरागस हसू मला आठवतं आणि नकळत डोळ्यांच्या कडा पानांवतात.पण त्याने ज्यांना जन्म दिला, खांद्यावर बसवून जग दाखवलं, खस्ता खाऊन, पोटाला चिमटा देऊन मोठं केल, स्वतःच्या पायावर उभं केलं त्यांना आपला बाप कुठंतरी बेवारसाची मौत मेलाय,याची कल्पनाही नसावी?
यापेक्षा दुर्दैव ते काय?
(मित्रांनो शेवटी एकच सांगतो,ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या आईवडिलांना कधीच दुख देऊ नका.भलेही त्यांनी पैसा अडका, सोने नाणे काही मिळवून ठेवलं असेल किंवा नसेल.पण तरीही ते आपले जन्मदाते आहेत.त्यांच्यामुळेच आपण हे जग बघत असतो.आपल्याला लहाणाचं मोठं करायला त्यांनी खुप खस्ता खालेल्या असतात.त्याची जाण ठेवा. त्यांना तुम्ही उतारवयात यातना दिल्या तर ते पातक तुम्ही उभ्या आयुष्यात फेडू शकणार नाही.
तसेच रस्त्यावरचा भिकारी असो किंवा कोणी वेडा असो त्याला मारहाण करु नका. ते त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे तसे झालेले असतात.तुम्ही त्यांना जगवू शकत नसाल तर त्यांना मारायचा अधिकारपण तुम्हाला नाही हे लक्षात ठेवा.)
0 टिप्पण्या