2021 मधली कोणती गोष्ट बदलायला आवडेल? मी उत्तर दिलं होतं "आळस" 2022 मध्ये, स्वतःमध्ये बदल म्हणजे, आळस झटकणार हो. हो अगदी खरंच आणि मनापासून बर का. आपल्या मराठीत एक म्हण आहे, "मन चिंती ते वैरी न चिंती". आपला दुश्मन सुद्धा असा विचार करणार नाही, असे विचार आपले मन करते. पण हे कधी? म्हणजे जेव्हा रिकामे असते तेव्हा.
म्हणजे निष्क्रिय असते तेव्हा. म्हणून मनाला सतत कार्यमग्न ठेवण्याची गरज असते. म्हणजे रिकामे विचार डोक्यात येत नाहीत. "रिकामे मन, सैतानाचे घर" तसेच "शरीराची हालचाल कमी, रोगाला निमंत्रण" त्यासारखी नवीन म्हण बनवण्याचा प्रयत्न केला हो. जाऊ दे, मला काय म्हणायचे ते लक्षात आले ना. सर्व काही शक्य असताना, केवळ आळसामुळे, जर शरिराच्या व्याधी वाढत असतील तर, नक्कीच त्यात बदल केला पाहिजे. असे मला वाटते. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर सांगतातच, "वजन कमी करा, रोज फिरायला जा, योगा प्राणायाम करा". मग हे अगदी डॉक्टरांनी, सांगेपर्यंत वेळ कशाला येऊ द्यायची? आळसावर नक्कीच विजय मिळवायचा आहे. आरोग्याच्या चांगल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत. आणि महत्वाचे म्हणजे त्या टिकवायच्या आहेत.आणि शारीरिक तंदुरुस्ती मिळवायची आहे. रोज सकाळी लवकर उठणे, सध्या थंडीमुळे कधी कधी शक्य होत नाही. पण थंडी थोडीच कायम राहणार आहे? आता सकाळी 7 वाजले तरी सूर्याचा पत्ता नसतो. पण उन्हाळा चालू झाल्यावर, सकाळी सहा वाजताच , सूर्य चांगलाच वर येतो. त्यामुळे लवकर उठावेच लागेल.सकाळी लवकर उठले की, आपोआपच फिरण्यासाठी वेळ मिळतो. पटापट कामे उरकली जातात. अगदी रोज आठवणीने आलाराम लावून, उठणार आहे. आणि नाही उठले तर नवरोबांना रागवायला पण सांगणार आहे. धाक हवा ना काही तरी. एकदा का लिंक लागली ना, मग आपल्यालाही आवड निर्माण होऊन, सवय होते. आणि थांबलेले वळण चालू होते. आणि तब्येतीचे जे छोटे-मोठे प्रॉब्लेम आहे, त्यांना मिटवणार आहे. त्याच्यावर विजय मिळणार आहे. वात प्रकृती असल्यामुळे, थंडीमध्ये खूप त्रास होतो, वजनामुळे फॅट्स वाढतात, जॉइंट दुखतात. त्यासाठी ठराविक, अशी आसने केली तर निश्चितच फायदा होतो. पण दोन्ही दोन्ही गोष्टी ना सकाळी वेळ मिळत नाही. ज्या दिवशी फिरायला जाणे जमणार नाही, त्यादिवशी घरी योगा करायचा. अल्टरनेट असे काही ना काही चालू ठेवायचे. मला जे वाटते किंवा जाणवतंय, फिरणे योगा बंद असल्यामुळे, तब्येतीचे प्रॉब्लेम सुरू झाले, ते सगळं मला पूर्वपदावर आणायचे आहे. नको रे बाबा, आळस हा माणसाचा शत्रू आहे. हे मनाला वारंवार बजावणार आहे. मोठ्या मोठ्या दुखण्यांवर, खर्च करण्याइतके आपण पैसे वाले तर लागून गेलो, नाही आहोत. हा पण विचार करायचा. मोठे मोठे आजार, ऑपरेशन, ही सगळी श्रीमंतांची दुखणी. त्यांनाच शोभतात.आमच्यासारख्या सामान्यांना, हे काय हो परवडणार? आणि शोभणार ही नाहीत.त्यापेक्षा सगळं कळत आहे ना, मग वळवायचा पण प्रयत्न करणार आहे. आणि हो, आपल्या संसारिक इच्छा!!. अजून बऱ्याच जबाबदार्या पार पाडायच्या आहेत, बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. आत्तापासूनच आजारी पडून कसं चालेल? शरीराची कार्यक्षमताही टिकवायला हवी ना. आणि जेवढं चालता-फिरतं शरीर, तेवढी दुखणी कमी. आणि महत्त्वाचं, आपल्याकडे कुठे मनुष्यबळ जास्त आहे. कुठही धावायला ,पळायला.लिमिटेड फॅमिली. त्यात रोजचा जगण्याचा संघर्ष. म्हणजे हात-पाय तर हलवावे लागतात ना. घरी कोणी आजारी किंवा ऍडमिट आहे म्हणून, घरी निवांत बसून चालतच नाही. रोजी रोटी कमवायला बाहेर पडावेच लागते. दीड महिन्यापूर्वी सासूबाई गेल्या. तीन दिवस नवरोबा घरात राहिले. चौथ्या दिवशी दुकानात हजर झाले. काही इलाजच नव्हता. एवढे दहा दिवस निवांत घरी थांबणे शक्यच नव्हते. असो. मला म्हणायचे एवढेच की, आपल्यासारख्यांना तब्येतीचे लाड परवडणार नाहीत. त्यामुळे वेळीच शहाणं झालेला कधीही चांगलं.त्यातून जे होईल, ते होईल. आणि मग तब्येत बरी नसली की, निराशा घेरते. आणि मग छोट्या छोट्या गोष्टीवरून डोळ्यात पाणी येणे, मानसिक समाधान बिघडणे, कशात उत्साह न वाटणे, या गोष्टी होत राहतात. म्हणूनच मनाचे आरोग्य ही सुधारायचे आहे. शरीर तंदुरुस्त असेल तर, मनही तजेलदार राहते. वेगवेगळ्या गोष्टी करायला उत्साह राहतो. आवड जपली जाते. क्षमता वाढते शरीराची आणि मनाची ही. आणि घरातील स्त्री जर हसतमुख राहिली तर संपूर्ण घरही हसत मुख राहते. आणि हेच, घरातील स्त्री आजारी पडली तर, संपूर्ण घर आजारी पडल्यासारखे वाटते. कारण सगळ्या कामांचा बट्ट्याबोळ होऊन जातो. बाईचा एक हात फिरला की घर लख्ख होऊन जातं. आणि याच्या उलट स्थिती असली की, घराची दयनीय अवस्था होऊन जाते .असो.हा एक बदल जरी, मी स्वतः मध्ये केला,. तर त्याचे कितीतरी सकारात्मक परिणाम दिसतील. जास्त थकवा जाणवणार नाही, शरीराची, मनाची कार्यक्षमता वाढेल.आणि मुख्य म्हणजे हसत-हसत सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडेन. आताही पाडत नाही असे नाही, पण मध्येच तब्येतीच्या तक्रारी असतात, त्यामुळे दुकानात जाणे होत नाही, नवऱ्यावर कामाचा लोड पडतो , अशा गोष्टी होणार नाहीत. अजून एक्स्ट्रॉ काम करायला उत्साह येईल. स्वतःमध्ये हा बदल तर निश्चितच करायचा आहे. ,"शारीरिकदृष्ट्या फिट" ही विजयश्री खेचून आणायची आहे.
0 टिप्पण्या