एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असताना त्याने आपल्यासाठी काही खास क्षणांची आठवण किंवा आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी जर एखादी भेट वस्तू दिली, तर ती वस्तू आपल्यासाठी नक्कीच खूप खास असते. आपण त्या वस्तूला अगदी लपवून सुरक्षित ठेवण्यापासून ते तिला एखाद्या आपल्या आवडीच्या ठिकाणी, नजरेच्या समोर दिसावं असं ठेवतो. मग त्या वस्तूला बघितलं, की आपल्याला त्या व्यक्तीने ती भेटवस्तू देताना काय म्हंटल, कसे हवं भाव दिले, किती प्रेमाने ती वस्तू दिली! कुठल्या दिवशी दिली. तो क्षण कसा होता हे सगळच आपण त्या वस्तूला बघून बसल्या जागी अनुभवतो. तो क्षण आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि ती व्यक्तीही. मग काय! दिलं गार्डन गार्डन हो गया भवरा बगीयन मे खो गया! असंच काहीस आपलं होतं.
ती भेट वस्तू म्हणजेच आपल्यासाठी त्या व्यक्तीची उपस्थिती असते. मग त्या निर्जीव वस्तूलाही सजीवपणा येतो. आपण त्या वस्तूला गोंजारतो. त्या व्यक्तीच्या आठवणीत कधी व्याकुळ झालो, की ती भेटवस्तूच आपला आधार होते. व्यक्ती प्रमाणेच त्या वस्तुशी आपल्या असंख्य भावना जुळल्या जातात. कधी अलगद आपण त्या वस्तूला आपल्या कवेत घेतो, तर कधी त्या वस्तूंशीच संवाद साधू लागतो.प्रेमात असताना त्या व्यक्तीने दिलेल्या भेटवस्तू आपल्यासाठी किती मौल्यवान असतात.पण जर आपली त्या व्यक्तीशी ताटातूट झाली तर मात्र त्या वस्तूंच काय करावं हा आपल्यासमोर मोठा प्रश्न उभा राहतो. कारण जर ताटातूट झाल्यानंतर ती व्यक्तीचं आपल्या जवळची राहिली नसेल, तर त्या व्यक्तीशी जुळलेल्या त्या भेटवस्तू नामक आठवणी तरी आपल्या जवळ का ठेवाव्या हा विचार आपल्या मनात येतो.
काही लोक त्या वस्तू त्या व्यक्तीच्या अचानक आपल्याला सोडून जाण्यामुळे रागाने तोडतात किंवा फेकून देतात. तर काही त्या वस्तू त्या व्यक्तीला पुन्हा परत देतात. कारण त्यांना त्या व्यक्ती बरोबरच त्या आठवणी ही आपल्याजवळ ठेवणं खूपच कठीण होतं. त्या व्यक्तीशी निगडित कुठलीही गोष्ट जेव्हा जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा तेव्हा आपल्या भावना या तांडव करू लागतात. त्यामुळे आपल्याला पुन्हा त्या आठवणीने मानसिक आणि भावनिक त्रास होत राहतो.
पण प्रेमाच्या या वस्तू टाकून देण्यापेक्षा किंवा रागाने त्याची नासाडी करण्यापेक्षा एका गरजवंताला द्याव्या. कारण ती वस्तू आपल्या त्या प्रेमाचं प्रतीक असते जे एकेकाळी आपल्या आपण जीवापाड जपलेलं असतं. म्हणून प्रेम आपल्याला पुढचं जीवन व्यतीत करण्यासाठी मिळालं नसलं तरीही त्यावेळेच प्रेम खोडता येत नाही. म्हणून राग काढून त्या वस्तू नक्कीच फुटतील पण प्रेम मात्र आपल्या मनात तेवतच राहतं. म्हणून जमल्यास त्या व्यक्तीची आपल्या आयुष्यातली ती अनमोल वेळ समजून त्या भेटवस्तू वापराव्या किंवा त्यांना आपल्या नजरेपासून दूर ठेवाव्या. जर शक्य नाही झालं तरीही त्या घेताना जितक्या आदरपूर्वक त्या व्यक्तीकडून घेतल्या तितक्याच आदराने पुन्हा परत कराव्या.कारण त्या फक्त वस्तू नाही तर त्या भावना आहेत. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है! सब भिजवा दो, मेरा समान लौटा दो!
0 टिप्पण्या