आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असो, आपली बिघडलेली तब्येत नीट करायची असो किंवा एखाद्या अवघड प्रसंगांला सामोरे जायचे असो, आपले मन खंबीर असेल तर आपण काहीही करू शकतो. अगदी थकलेल्या शरीराला पुन्हा उभे करू शकतो, इतकी ताकद आपल्या मनात आहे. अशा या मनाची योग्य काळजी घेणे, आपल्याच हातात असते. आनंदी, उत्साही मन नवनवीन गोष्टी करण्याची ताकद आपल्याला देते तर, खचलेले, हरलेले मन घेऊन आयुष्यात आपण काहीही नवीन करू शकत नाही. त्यामुळे आपले वय तरुण असो वा म्हातारे, पण मनाला आपण कधीच म्हाताऱ्या अवस्थेत जाऊ द्यायचे नाही. ते तरूण राहील, ही जबाबदारी आपली. ही जबाबदारी घ्यायची कशी, ते आपण पाहू.मनाला आपण गांभीर्याने घेतो की गृहित धरतो? असा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला तर आपलेच आपल्याला उत्तर मिळेल की बऱ्याचदा आपण मनाला गृहितच धरत असतो. आपले स्वतःचेच आपल्या मनावर नियंत्रण नसते. त्याला ताब्यात ठेवण्यासाठी, शांत ठेवण्यासाठी आपलेच प्रयत्न कमी पडतात आणि मग छोट्याछोट्या गोष्टींचा त्रास आपल्याला व्हायला लागतो. यातून अगदी विशी तिशीतली व्यक्तीही साठी ओलांडल्यासारखी, थकलेली वाटायला लागते. कधीकधी तर बाहेरची परिस्थिती नियंत्रणात असली तरी उगाचच मन चिंतेत पडलेले असते. अचानक हळवे, चिंताग्रस्त, चौफेर उधळलेले, एकटे, रागीट तर कधी एकदम शांत.. आपण सगळेच या भावनांचा अनुभव घेत असतो. आपले मन अतिशय ताकदवान असते. शरीरापेक्षाही ताकदवान. आपण शरीर निरोगी राखण्यासाठी चांगला आहार घेतो, दिवसातून दोन – तीन वेळा जेवतो, आजारी पडलो तर दवाखान्यात जाऊन उपचार घेतो. पण हेच मनाला निरोगी ठेवण्यासाठी आपले प्रयत्न कमी पडतात. त्यामुळे उपचारांशिवाय असलेले मन म्हातारे व्हायला लागते. तर मनाला तरुण ठेवण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी काय करायचे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आपल्यात उत्साह असला की आपल्याला आळशीपणा वाटत नाही. आता हा उत्साह कसा आणायचा, असा प्रश्न पडतो. तर अगदी साध्या, सहज शक्य गोष्टी आपल्याला रोज कराव्या लागतील. व्यायाम, योगा, ध्यानधारणा याचा अवलंब आपल्या जीवनशैलीमध्ये आपण करायचा. त्याने काय होते तर, दिवस आनंदी आणि उत्साहात घालवण्याची ताकद आपल्याला मिळते. हा उत्साह आपल्यात असला की आपोआपच आपण आपल्यालाच तरुण वाटू लागतो. याबरोबरच, कामांमध्ये शक्य तितके बिझी राहणे, नवनवीन गोष्टी शिकणे, पर्यटन करणे, यातूनही आपण आपल्या मनाचे तारूण्य टिकवून ठेवू शकतो. मग भलेही आपले वय तरुण असो की आपले वय उतरणीला लागलेले असो.

हल्लीच्या काळात जीवनशैली संबंधित आजारांची संख्या अतिशय वाढली आहे. मानसिक आजारांची संख्या शारीरिक आजारांपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. अगदी लहान लहान मुलेही मानसिक आजाराच्या विळख्यात सापडलेली दिसतात. काहीही करण्याचा उत्साहच या मुलांमध्ये राहत नाही. अशा मुलांना पाहून आई - वडिलही चिंताग्रस्त होत असतात. याउलट, साठी पार केलेल्या व्यक्तींचे जीवन योग्य शिस्तीत चाललेले आपल्याला दिसून येते. आमच्या शेजारी एक आजोबा राहतात. रोज सकाळी एक तास योगा, प्राणायाम, संध्याकाळी चालायला जाणे, दिवसभर वाचन इत्यादी गोष्टी ते करत असतात. आज सत्तरीपार असूनही ते अगदी ठणठणीत आहेत. याउलट, दुसऱ्या मजल्यावर राहणारा एकविस वर्षांचा मुलगा सतत हातात मोबाईल घेऊन बसलेला असतो. यातून तो स्थूल तर झालाच पण काहीही नवीन करण्याची इच्छा त्याच्यात दिसत नाही. कोणी फिरायला, खेळायला बोलावले तरी सतत कारणे देऊन तो ते टाळतो. घरात बसून बसून तो एकलकोंडा झाला आहे. त्याच्या वयात आम्ही फिरायचो, कामे करायचो, मग हाच का असा थकलेला, घरात बसून राहणारा आहे, असे त्याची आई म्हणत असते. ही दोन्ही उदाहरणे मन तरुण असण्याचा आणि वयाचा काहीही संबंध नसल्याचे दर्शन आपल्याला घडवतात. कारण वयस्कर व्यक्ती आनंदाने जीवन जगत असल्याचे आणि तरुण मुलगा थकलेल्या मनाने जगत असल्याचे दिसून येते. आपल्या मन आणि शरीराला आनंदी ठेवण्याची किल्ली फक्त आपल्याच हातात असते. एखाद्या दुर्धर आजारातून बाहेर काढण्याची ताकद आपल्या मनात असते. ही ताकद जाणून घेत भावनिक, मानसिकरित्या म्हातारे होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे.

मन के हारे हार है, मन के जीते जीत
कहे कबीर हरि पाइए मन ही की परतीत ।
ज्याचे मन हरलेला आहे असा माणूस हरतोच, तर मनानी जिंकलेला माणूसच जिंकतो. ईश्वरालासुद्धा प्राप्त करण्याची ताकद आपल्यात आहे, ही ताकद आपण ओळखली की अगदी म्हातारपणातही तरूणासारखे जगू शिकू.