लाल रंग म्हंटले की, आपल्या डोळ्यांसमोर आपसूकच प्रेम येतं, लाल हार्ट येतं, रेड रोज आपल्याला दिसू लागतात. हे का होतं, तर आपल्याकडे लाल रंगाला प्रेमाचं प्रतिक मानलं आहे. मग मुलाला जर एखाद्या मुलीला प्रपोज करायचे असेल, तर तो लाल गुलाब घेऊन येतो. लाल शर्ट घालतो. लाल रंगाच्या कागदात अनेक गिफ्ट पॅक करून तिला देतो. म्हणजे प्रेमाशी संबंधित काही जरी असले की, आपण लाल रंगालाच प्राधान्य देतो. ‘व्हेलेंटाईन डे’ला सुद्धा मुली लाल रंगाचे कपडे घालून आपल्या पार्टनरला आकर्षित करताना दिसतात. या लाल रंगाविषयी तुम्हालाही कधीतरी उत्सुकता वाटली असेलच ना! लाल रंग हा प्रेमाचा प्रतिक कसा झाला हे तुम्हाला माहित आहे का? सगळे लाल रंगाला प्रेमाचा रंग म्हणून सेलिब्रेट करतात पण हा रंग प्रेमाचा रंग कसा झाला ते आज आपण या लेखात पाहूया...




अनेक वर्षांपासून ग्रीक आणि हिब्रू लोक लाल रंगाला प्रेमाचे प्रतिक मानत होते. तेराव्या शतकात एका प्रसिद्ध रोमन कवीने आपल्या प्रेयसीसाठी गुलाबाचे फुल शोधून तिला मनवत असल्याचे त्याच्या कवितेत म्हंटले होते. तेव्हापासून गुलाब हे लाल रंगाचे असते, मग प्रेमाला देखील लोकांनी लाल रंगात पाहायला सुरु केले असे म्हंटले जाते. लाल गुलाब हे जगभरातील अनेक देशांतील लोकांच्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाते. त्याचा वापर अनेक देशांमध्ये सुवासिक अत्तर बनविण्यासाठी केला जातो. त्यामुळे अनेक प्रेमवीर आपल्या प्रेयसीला मोहवण्यासाठी अत्तर वापरतात. तर चर्चमध्ये आणि इतर देवांनासुद्धा गुलाब वाहिले जाते. त्यामुळे गुलाब हे अत्यंत पवित्र फुल मानले जाते. तसेच ग्रीकमधील प्रेम आणि सौंदर्याच्या देवीला देखील गुलाबाचे फुल प्रिय आहे. त्यामुळे प्रेमाचे प्रतीक बनलेल्या गुलाबाच्या फुलाचा रंग लाल असल्याने प्रेमाला सुद्धा लाल रंग मिळाला असा इतिहास आहे.

आपल्याला हे माहित आहे की, क्रोध आणि धोका दर्शवायचा असेल तरी आपण लाल रंग वापरतो. अनेकदा धैर्य आणि त्यागाबद्दल सुद्धा लाल रंग वापरतात. मग हा रंग प्रेमाशी कसा काय एकरूप झाला असावा? प्रेम तर अत्यंत हळवी भावना आहे. मग या भडक भावनांना जो रंग दिला आहे तो रंग प्रेमाचा कसा? तर आपण पाहतो, प्रेम ही एक भावना जरी असली तरी त्यामध्ये असणारे दोघे आपल्या प्रेमाला अनेक भावनांमधून अनुभवत असतात. प्रेमामध्ये सगळं काही फक्त सुखी आणि आनंदीच नसतं तर खरे प्रेम हे त्यागात असते असे अनेक लोक म्हणतात. बऱ्याचदा आपले प्रेम पूर्ण होऊ शकत नाही म्हणून प्रेमवीर आपल्या प्रेमाचा त्याग करतात आणि ते विसरण्याचा प्रयत्न करतात. ज्या प्रेमात तुम्हाला विजय मिळत नाही, जे प्रेम अधुरे राहते ते कधीच मरत नाही असे म्हणतात. कारण त्या प्रेमात त्याग केल्याची ताकद असते. आणि आपण त्यागाचा रंग लाल असल्याने प्रेमाला देखील त्याच रंगात पाहतो.

प्रेमात आपण पाहतो की बऱ्याचदा रुसवे-फुगवे असतात. दोघेही एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या कारणाने चिडतात, रागावतात आणि काही वेळेस तर त्यांचे भांडण एवढे विकोपाला जाते की त्याचा उद्रेक होतो. मग कोणत्याही प्रकारच्या क्रोधाला दर्शवायचे असेल तर लाल रंग आपण दाखवतो. मग प्रेमात सुद्धा क्रोध असल्याने प्रेम हे लाल रंगात रंगून जाते. प्रेम करताना अनेकजण आपल्याला सल्ला देतात, ‘प्रेमात पडू नको पस्तावशील!’ प्रेमात माणूस देवदास होतो, असे देखील मजेत बोलले जाते. त्यामुळे प्रेम करताना सावधान राहण्याचे अनेक अनुभवी प्रेमवीर सांगत असतात. याचाच अर्थ प्रेमात धोका आहे असे त्यांना म्हणायचे असते आणि आपण धोक्यासाठीदेखील लाल रंग वापरतो. त्यामुळे इथे सुद्धा प्रेमाला लाल रंगात तोलले जाते. त्यामुळे प्रेम ही भावना जरी एक असली तरी त्याला जोडणाऱ्या इतर भावना या लाल रंगाशी निगडित असल्याने प्रेमाला लाल रंग मिळाला आहे.

तसेच लाल रंग हा वातावरणातील सर्वात शक्तिशाली आणि आकर्षक रंग असल्याने अनेकांना तो लगेच भावतो आणि प्रेम ही अशी भावना आहे जी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. मग लाल रंगाचे कपडे परिधान केलेली स्त्री सुद्धा सगळ्यांनाच आवडते. म्हणजे लाल रंग हा प्रेमाच्या भावनेशी पूर्णपणे समरूप होतो. आणि लाल रंग हा भडक असल्याने त्याच्याकडे लगेच लक्ष केंद्रित होते. त्यामुळे लाल रंगाला प्रेमात जास्त महत्व प्राप्त होऊन तो प्रेमाचे प्रतीक बनला आहे.