आयुष्यभराचा जोडीदार निवडायचा म्हणजे खूप मोठा निर्णय असतो. पण काहीजण जोडीदाराबाबत फक्त बाह्य गोष्टींवर अधिक भर देतात आणि मग लग्न झालं की त्या व्यक्तीच्या एकूणच वागणुकीवरून पटत नाही म्हणून पश्चाताप करत राहतात. पण जर जोडीदार निवडतानाच काही चांगल्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर नक्कीच आयुष्यभरासाठी पश्चाताप करावा लागत नाही.
आपल्या मैत्रिणीचा नवरा कसा उंच, गोरा-गोमटा, देखणा, श्रीमंत आहे तसाच आपल्याला ही नवरा मिळावा अशीच सखीची इच्छा होती. आई-वडिलांनी सखीसाठी योग्य, तिच्याशी मिळतं-जुळतं घेईल अशा दोन तीन मुलांना निवडलं पण सखीने मात्र त्यांच्या पगारावरून, रंगावरून, दिसण्यावरून त्यांना नाकारलं. ‘लग्न करेन तर मला आवडेल अशाच मुलाशी!’, अशी अटच तिने आपल्या आई-वडिलांना घातली. अनेक नातेवाईकांनीही तिला चांगली चांगली स्थळं सुचवली पण तरीही त्या सगळ्यासाठी तिने नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी ती आपल्या मैत्रिणीला भेटली तेव्हा तिची मैत्रीण खूपच खचली होती. ‘लग्न करताना केवळ मुलाच्या श्रीमंतीवर, दिसण्यावर भाळून लग्न केलं पण त्यांच्यातले चांगले गुण पाहिलेच नाहीत म्हणून दोघांचंही पटत नाही. एकमेकांशी बोलायला गेलं तरी भांडणं होतात. नवरा प्रत्येक गोष्टीवरून टोकत राहतो’, असं सर्व ती सखीला रडत रडत सांगत होती. त्यातून सखीलाही आपल्या जोडीदारात या बाह्य गोष्टींऐवजी काय शोधावं, आयुष्यभरासाठी जोडीदार निवडताना त्याच्यात काय पहावं, या गोष्टी लक्षात आल्या
कोणाला ही आपण जेव्हा विचारतो की, तुला तुझा आयुष्यभरासाठीचा जोडीदार कसा हवा तेव्हा १०० पैकी ८३% लोक हेच सांगतात की, जोडीदार दिसायला सुंदर हवा, माझ्यापेक्षा जास्त कमवता हवा, उंच हवा, श्रीमंत हवा. मुलांनाही मुली झिरो फिगर हव्या, गोऱ्या हव्या, अशा अनेक अपेक्षा असतात किंबहुना त्यांनी जोडीदार कसा हवा, याची एक लिस्टच काढून ठेवलेली असते तर काही जणांना नक्की जोडीदार कसा हवाय, हेच माहीत नसतं. आज-काल तर अनेक जोडपी त्या व्यक्तीला समजून उमजून मग निर्णय घेण्यापेक्षा भलत्याच गोष्टींना प्राधान्य देतात आणि लग्नासारखा मोठा निर्णय घेतात. काही दिवस चांगलं चाललेलं असतं पण मग बाह्यगोष्टी चांगल्या असल्या तरी माणूस म्हणून आणि जोडीदार म्हणून तो माणूस अजिबातच योग्य नसतो. मग वेगळं व्हा, घटस्फोट घ्या, आपल्या सोबतच हे घडलं म्हणून मानसिक ताणतणावात जगा अशी वेळ येते. म्हणून आयुष्यभराच्या जोडीदार निवडताना कुठल्या गोष्टी बघाव्या किंवा कसा जोडीदार निवडावा ते आपण पाहूया.

सर्वात आधी तर तुम्ही त्याच्या बाह्य गोष्टींपेक्षा त्याची वागणूक कशी आहे, बाहेर गेल्यानंतर तो इतर व्यक्तींशी, तुमच्याशी कसा वागतो, त्याच्यात किती नम्रपणा आहे, तुमच्या मतांना तो किती अर्थ देतो, तुम्ही बोलत असताना तो किती ऐकतो, एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला तो किती प्रोत्साहन देतो, तुमच्यातल्या कुठल्या चांगल्या गुणांचं कौतुक करतो, तुमचा किती आदर करतो त्याच बरोबरीने एखाद्या प्रसंगात तुमच्या मागे तो किती खंबीर पणे उभा राहतो हे पाहण्याचा प्रयत्न करा. तुमचा भावी जोडीदार तुम्हाला सतत प्रत्येक गोष्टीवरून टोकत तर नाही ना आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यावर किती प्रेम करतो आणि प्रेमात काय काय करू शकतो हे ही महत्त्वाचं आहे.

जर या गोष्टी आपण आपल्या आयुष्यभराचा जोडीदार निवडताना पहिल्या तर नक्की ते नातं समाधानी आणि दीर्घ काळ टिकेल. छोट्या-मोठया गोष्टीवरून नातं तोडण्याची वेळ येणार नाही. जोडीदारात बाह्यसौंदर्य कमी असेल कदाचित, तो तितकासा श्रीमंत ही नसेल पण एक जोडीदार म्हणून आणि माणूस म्हणून तुमची तो योग्य सोबत बनू शकतो. म्हणून इतर प्रलोभनांना भुलण्यापेक्षा जोडीदाराच्या आंतरिक गुणांना प्राधान्य द्या. नक्कीच तुम्ही योग्य जोडीदारासोबत एक उत्तम आयुष्य जगू शकाल.
प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतं पण प्रत्येक जण ते पाहत नाही!