स्वातीला बाळ होऊन वर्ष उलटल्यानंतर ती घाईघाईतच आम्हा सर्व मित्र मैत्रिणींना भेटायला आली होती. भेटल्यानंतरही सतत घरी फोन करून आपल्या बाळाची चौकशी करत होती. आम्ही सर्व एकमेकींशी गप्पा मारत होतो पण हीचं मात्र कशातच लक्ष लागत नव्हतं. लग्न झाल्यानंतरही ही मुलगी एवढी कधी वेळ पाळत नव्हती पण आज एका तासात आली काय,आणि गेली काय कळलंच नाही. भेटायला आल्यापासून तीचं सारखं एकच सुरू होतं माझं बाळ आहे घरी!... ते म्हणतात ना, घार ऊडे आकाशी तीच लक्ष पिल्लांपाशी! अशी तिची गत झाली होती. खरं तर लग्न झालेलं असलं तरीही कोणाची तरी बायको कोणाचा तरी नवरा या भूमिकेला सांभाळतांना आपण आपली काम करत असतो. स्वतःलाही थोडा फार वेळ देता येतो. त्यातल्या त्यात कधी आपल्या बायकोला घेऊन सिनेमाला जा, नाटक पहा, दोघांना वाटेल तिथे वाटेल तसं हिंडा-फिरा, एकमेकांसोबत निवांत मोकळा वेळ घालावणे, त्याचबरोबरीने आपापल्या नोकरीला आणि घरच्या कामाला सांभाळून मित्रमैत्रिणी सोबत मोकळा वेळ घालवणे, पार्ट्या, गेट टू गेदर करणे या सगळ्या गोष्टी करता येतात.
पण जेव्हा नवरा बायकोचे आई-बाबा होतात तेव्हा नक्कीच त्यांच्यात अनेक बदल होत जातात. त्यातला सर्वात मोठा बदल म्हणजे त्यांच्या वेळेचं पूर्णपणे गणित बदलून जातं. स्त्रिया त्यांचा पूर्णवेळ आपल्या बाळाच्या खाण्यापिण्याच्या वेळेनुसार ठरवतात. पण बाळ झाल्यानंतर वेळेचं नियोजन जरी केलं तरीही स्वतःसाठी वेळ मिळत नाही.पुरुष कामावरून कितीही दमून भागून आले तरी आपल्या बाळाला खेळवणं, बायको जेवत असेल तर तिला जेवता यावं म्हणून स्वतःचं बाळाची कामं करणं, बाळाच्या रडण्यामुळे तिची झोप झाली नाही म्हणून जरा उशिरा ऑफिसला जाणं, स्त्रियां नोकरी करत असेल तर त्यातून ब्रेक घेणं किंवा घरी सांभाळणार कोणी नसेल तर पूर्णपणे बाळाच्या देखभालीत स्वतःला वाहवून द्यावं लागतं. पुरुषांना जर व्यसन असेल तर ते ही घरी आपला लहानगा जीव आहे या विचाराने या गोष्टी टाळतात.
बाळ जसं दोन-तीन महिन्याचं होतं तसं तसं बाळाचे पालक म्हणून आर्थिक जबाबदाऱ्याकडे ही पाहणं गरजेचं ठरतं. त्यासाठी हळूहळू दोघेही आपल्या अनेक खर्चातून हात आखडता घेतात. वायफळ खर्च बंद होतात. आता बाळाचा वाढदिवस, शिक्षण,भविष्य, आरोग्य यामध्ये कुठे कमी पडू नये म्हणून खर्चाचा हिशोब व्यवस्थित हाताळला जातो. नवरा-बायकोमध्ये विनाकारण एकमेकांना गिफ्ट देणं,महागड्या वस्तू घेणं, स्वतःची हौस मौज या सगळ्या गोष्टीचा खर्च कमी कमी होत जातो.
बाळ झाल्यानंतर नवरा-बायको दोघांच्या स्वभावात आणि मानसिकतेतही बदल होत जातो.बाळ होण्यापूर्वीचे नवरा-बायको यांना अनेक प्रकारे हिंडण्याफिरण्याची, एकमेकांना वेळ देण्याची त्यावेळी खूपच गरज असते दोघेही पण नंतर भांडणं, चिडचिड या गोष्टी बाळाला लक्षात घेत कमी होतात. बाळाच्या येण्याने दोघांमध्येही जबाबदारीच्या, मायेच्या भावना असतात. दोघेही एकमेकांना आता माझा नवरा किंवा माझी बायको याही पलीकडे जात माझ्या बाळाची आई माझ्या, बाळाचे बाबा या भूमिकेत शिरून पाहतात. बाळाबरोबरच एकमेकांची ही काळजी करत राहतात. दोघांमध्ये या तिसऱ्याच्या येण्याने त्याच्यातल्या तक्रारीचा सूर निवळला जातो.आणि आपसूकच एकमेकांना सांभाळत ते आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार करत राहतात. त्यांना नवरा बायको ते आई बाबा प्रवासात त्यांचं बाळ हे त्याच्यातल्या प्रेमाला वेगवेगळ्या तर्हेने खुलवण्यासाठी एक दुवा होऊन जातं.