माणसांचा स्वभाव हा भलताच निराळा आहे. जेव्हा आपण एखाद्यावर चिडतो, रागावतो किंवा दुःखी असतो तेव्हा आपल्याला एकांत हवा असतो. तर जेव्हा आपण एकदम खूष असतो, उत्साही असतो तेव्हा आपल्याला सोबतीला कोणीतरी हवं असतं. अशा क्षणी जर आपण एकटे असू तर लगेच आपल्याला वाटतं, ‘यार, आपल्या सोबत कोणीतरी हवं. हा एकांत आता खायला उठला आहे.’ पण तुम्हाला माहिती आहे का, एकांत हा खूप गरजेचा असतो. म्हणजे स्वतःला सोबत करता येणं, स्वतःसोबत राहणं आणि मुख्य म्हणजे स्वतःची सोबत आवडणं हे या जगात खूप आवश्यक झालं आहे.
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात. म्हणजे आता बघा, शाळेत असताना शाळेचा ग्रुप वेगळा, कॉलेजचा वेगळा, मग ऑफिस आणि लग्न झालं की त्यानंतर अजून काही वेगळंच असं आपल्या नशिबात येत असतं. मग अशावेळी ज्या माणसांची आपल्याला सवय झालेली असते त्यांची ठराविक काळानंतर ताटातूट होते आणि मग आपण एकटे पडत जातो. अर्थात अशी ताटातूट सगळ्यांच्याच पचनी पडते असे नाही. कारण अनेकांना एकांत हा आवडतच नसतो.एकांत म्हणजे नक्की काय तर आपल्यासाठी आपण दिलेला मोकळा वेळ, निवांत क्षणी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहण्याची संधी, विचार करण्यासाठी असलेली मुभा आणि स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करण्यासाठीचा अवधी. काही जणांना सतत बडबड करण्याची सवय असते. त्यामुळे सतत आजूबाजूला चार माणसं, गप्पा यांची सवय त्यांना झालेली असते. कधी चुकून मग एकांतात राहण्याची वेळ आली की त्यांना अंधाऱ्या खोलीत बसल्याचा भास होतो. कधी एकदा यातून बाहेर येऊन लोकांच्या गोतावळ्यात जातोय असं त्यांना होतं. तसे वाटणे स्वाभाविक आहेच पण स्वतःचा विकास घडवायचा असेल तर एकांत खूप महत्वाचा असतो.
जेव्हा आपण एखाद्या गर्दीत असतो तेव्हा आपल्या डोक्यात विचार नसतात. केवळ गोंगाट असतो. पण तेच जर एका शांत ठिकाणी आपण बसलो तर आपल्या डोक्यात विचार येतात. त्यांच्यावर शांतपणे विचार करताना आपल्याला आपल्याच प्रश्नांची उत्तरं गवसतात. एका वेगळ्या नजरेतून गोष्टींकडे पाहण्याची सवय आपल्याला लागते. एकटेपणा आणि एकांत या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. कारण एकटेपणा हा काही कारणांनी आपल्याला आलेला असतो तर एकांत ही आपण स्वतःसाठी राखून ठेवलेली वेळ असते. तेव्हा या दोन्हीत गफलत होता कामा नये.
इतरांच्या सोबत फिरताना नुसती पाणी वाहून घेऊन जाणारी नदी एकांतात मात्र जीवनदायिनी होत आपल्याशी संवाद साधते आहे असा अनुभव येतो. त्यातून आपल्या आत कोणती खळबळ माजली आहे आणि ती कशी शांत करायची याचे उपाय देखील आपल्याला मिळायला सुरुवात होते. एवढेच काय पण आपली निर्णय घेण्याची क्षमता, निरीक्षण शक्ती यांची सुध्दा वाढच होते. तसेच कधी आपल्यावर एकटे राहण्याची वेळ आली तर आपण स्वावलंबी होत जातो. कारण एकांताने शिकवलेले धडे आपल्या सोबतीला असतात.
आपण आपल्या समोरच्या माणसांना लगेच ओळखू शकतो पण कधी स्वतःला काय हवं, काय नको हे पाहण्याची तसदीच घेत नाही. तर स्वतःला ओळखण्याची संधी एकांत देतो. एकांतासाठी कधीतरी आपण सोलो ट्रीपला जावं. एकट्याचीच मजा मस्ती, अनुभव यांची शिदोरी सोबतीला ठेवावी. यामुळे पुढे जाऊन कधी एकटेच राहण्याची वेळ आलीच तर त्याचे वाईट वाटू नये. असे जर आपण केले तर आपलीच सोबत आपल्याला आवडेल. प्रसंगी एकटे असलो तरी सुखी, समाधानी राहू शकू याची जाणीव होईल. कारण शेवटी कधी, कोण, केव्हा, कसे आपल्यातून निघून जाईल याची शाश्वती नसते. त्यामुळे जर आपण स्वतःसोबत कंफर्टेबल असू तर आपण एक छान आयुष्य जगू शकू. शेवटी यावर वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेल्या काही सुंदर ओळी आठवतात. ज्यात ते म्हणतात, "एक बाकी एकाकी, एक अंत एकांत lएक अडके एकात, एक एकटया जगात llएक खिडकी एक वारा, एक चन्द्र एक तारा lएक नजर एक वाट, एक एकटा एकटाच...ll"
0 टिप्पण्या