“दे दे मी धरतो, तू सावकाश चाल!” हातात काही जड सामान त्याला दिसलं, की त्याला ते घेतल्याशिवाय राहवत नाही. दिवसभराच्या कामाच्या व्यापाने जशी मी दमते तसा तो ही दमतो. पण तरीही सकाळी मला उठवत नसेल, तर जेवणाच्या डब्यासाठी आरडाओरडा, तक्रारी करत नाही. त्याच्या बाजूला अगदी अंगात त्राण नसल्यासारखी मी पडलेली असताना तो “झोप, राहू दे डब्बा! मी खाईन काहीतरी. आराम कर!” असं सहज बोलून जातो. त्याच्या अंघोळीच पाणी, सकाळचा चहा मला झोपेतून न उठवता तो स्वत: करून घेतो. अगदीच कधी घाई असेल तर नाश्त्याची फर्माईश न करता डब्यात असलेले खारी-बटरही त्याला चालतात. सकाळी स्वत:ची तयारी, लागणाऱ्या वस्तू सगळं काही स्वत: करत असतो. काही मिळालं नाही, की घरभर शोधतो. पसारा करतो पण जमेल तसं घाईघाईत जागच्याजागी सगळ्या वस्तु ठेवल्या जातात. माझी झोप मोड होऊ नये म्हणून त्याचं त्याचं सावकाश सगळं चालू असतं. निघताना डोळे चोळत त्याला ‘संध्याकाळी लवकर ये’ म्हणायला मी फक्त दारात उभी असते.

जाताना ‘व्यवस्थित नाश्ता करून काम कर’ हे त्याचं नेहमीचं वाक्य. आपल्या बायकोची झोपमोड होऊ नये म्हणून सकाळच्या घाईत कधीही आरडाओरडा न करता तडजोड करणारा माझा पहिलाच नवरा असावा नाहीतर उगाच इतर बायका ‘आमची झोप पूर्ण होत नाही’ असं पुरुषांच्या लक्षात आणून देत राहिल्या नसत्या.
मला आठवतंय लग्नाच्या सुरुवातीच्या काही दिवसात त्याच्या कामाच्या वेळा वाढल्या होत्या. दोघांनाही पुरेसा वेळ मिळत नव्हता. मी कामात अडकलेले असायचे. दोघात सुरुवातीपासून दुरावा नको, वेळेत घरी येऊन दोघांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून सकाळी घरातून लवकर निघून तो ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी धावतधावतचं घरी यायचा.
संध्याकाळी मी घरी वाट पाहत असते हे लक्षात घेऊन तो पहिला फोन मला करतो. माझं कशाने काही अडणार नाही ना म्हणून काही समान आणायचं आहे का? हे रोजचं विचारतो. कधी माझ्या लक्षात नसल्या तरी त्याच्या लक्षात असलेल्या गोष्टी तो स्वतः करत राहतो. त्यासाठी मला कधीच तू का काही केलंस नाही असं म्हणत नाही. त्याची क्रिकेटची अत्यंत महत्त्वाची मॅच सुरू असताना तो पूर्णपणे त्यात गुंतून गेलेला असतो. पण मी त्याच्या बाजूला बसल्यानंतर मला मालिका बघायच्या असतात हे त्याला कळतं. माझ्या बरोबर विनातक्रार तो मालिका बघत राहतो. एकदा दिवाळीच्या वेळेस घरातल्या सगळ्यांसाठी, माझ्यासाठी त्याने आम्हाला हवं ते सगळं घेऊन दिलं. त्याला बघताच आवड्याल्या म्हणूण मला दोन साड्या आणून दिल्या होत्या. पण स्वतः मात्र माझ्याकडे भरपूर कपडे आहेत म्हणत गेल्या वर्षी घेतलेल्या कपड्यांमध्येच तो होता.
सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी किंवा अगदी सकाळी किचनमध्ये त्याची शेफगिरी सुरू होते. बघ कसा बनवतो नाष्टा! असं बोलून वारंवार मला चिडवलं जातं. पण घर आणि नोकरीने माझी होणारी दगदग तो जाणून आहे हे मला त्याच्या वागण्यातून कळतं. एवढंच काय रस्त्यात माझं लक्ष नसताना नकळत बाजूला ओढून घेणं, गाडीत स्वतः बरोबरचं माझं ही सीटबेल्ट बांधणं, उंच टेबलावर उभी राहून काम करत असताना नकळत त्या टेबलाला आधार देणं अशा कितीतरी गोष्टी तो न बोलता करत असतो. पण शेवटी आपल्यावर मनापासून कोणी प्रेम करतंय, न बोलता, न ओरडता आपली काळजी घेतंय ही भावनाच किती सुखावणारी असते.
आपण बायका आपल्या नवऱ्याविषयी अनेक तक्रारी करत असतो. तो रागवतो, ओरडतो, आपल्याला वेळ देत नाही, धाकात ठेवतो असं बरंच काही. आपल्याला मिळत असलेल्या प्रेमाकडे अनेकदा आपण दुर्लक्ष करतो आणि नवऱ्याच्या वाईट गोष्टी किती आहेत यावर अधिक भर देतो. त्याच्या मनात आपल्याविषयी असणारं सुप्त प्रेम कळण्यासाठी फक्त डोळे उघडे ठेवून त्याच्याकडे बघा.. आपल्या मनासारखं काही झालं नाही, तर तक्रारी करून त्याला हिणवण्यापेक्षा तो आपल्यासाठी करत असलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टीतून त्याचं प्रेम ओळखायला शिका.
0 टिप्पण्या