सध्या आपल्याला आपला मोबाईल फोन प्राणापेक्षाही प्रिय झाला आहे. आपण सर्वजण आपले स्मार्टफोन सतत आणि दीर्घ कालावधीसाठी वापरत असल्यामुळे त्याच्या बॅटरीचा अधिक वापर होतो आणि काही वेळातच तुमची बॅटरी मान टाकते. तुमच्या फोनची बॅटरी जास्त वेळ चालण्यासाठी योग्य प्रकारे चार्ज कशी करावी? तिची काळजी कशी घ्यावी असे प्रश्न तुमच्या मनात येतच असतील. मग ह्या लेखात तुमच्या मनातील काही प्रश्नांना उत्तरे देण्याचाच प्रयत्न केला आहे, नक्की वाचा.





● बॅटरी चार्जरला कधी कनेक्ट करावी?

आपण स्मार्टफोन वापरताना पहिली चूक करतो की बॅटरी पूर्ण उतरण्याआधीच पुन्हा चार्जिंग करतो, जे पूर्णपणे चुकीचे आहे. चार्ज केलेली बॅटरी उतरणे याला 'डिस्चार्ज सायकल' असं म्हणतात. प्रत्येक स्मार्टफोनमधील बॅटरीला ‘डिस्चार्ज सायकल्स’ असतात आणि बहुतेक बॅटरी या ४००-६०० डिस्चार्ज सायकलनंतर खराब होतात. म्हणून, जर तुम्ही आपला स्मार्टफोन हुशारीने चार्ज केला आणि फोनची बॅटरी १० ते २०% च्या दरम्यान आल्यावरच चार्जरला कनेक्ट केली, तर आपल्या फोनच्या बॅटरीची डिस्चार्ज सायकल लवकर संपणार नाही  ज्यामुळे आपोआप आपल्या स्मार्टफोनच्या बॅटरीचं आयुष्य वाढेल.


● चार्जिंग डिस्कनेक्ट कधी करावं?

दुसरी चूक जी हमखास केली जाते ती म्हणजे बॅटरी १००% चार्ज झाल्यानंतरही आम्ही चार्जर डिस्कनेक्ट करत नाही. ही मोठी समस्या नसली तरी बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर चार्जिंग जास्त काळ चालू ठेवत असाल तर बॅटरी गरम होऊन फुगू शकते आणि तिचे आयुष्य कमी होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून लक्ष देऊन फोन चार्ज करा.


● चार्जर आणि केबल्स कोणत्या वापराव्यात?

आपण आयफोन किंवा अँड्रॉइड मोबाईल वापरत असलात तरी काही फरक पडत नाही. पण स्वस्त चार्जर किंवा केबल्स वापरल्या तर नुकसान होऊ शकतं म्हणून कधीही ते वापरू नका. बॅटरी पुन्हा चार्ज करण्यासाठी प्रमाणित चार्जर आणि केबलच वापरा  ज्या तुम्हाला फोन सोबत मिळाल्या आहेत. मान्य आहे की मूळ चार्जर आणि केबल महाग आहेत परंतु ते आपल्या स्मार्टफोनच्या बॅटरीचे आयुष्य कमी होऊ देत नाहीत.


● कवर घातलेला फोन तसाच चार्ज करावा का?

तुम्ही फोनला कवर घातलं असेल तर ते काढून स्मार्टफोनची बॅटरी चार्ज करा. कारण आपला स्मार्टफोन तासनतास चार्ज करत असताना कवर घालून चार्ज केल्याने फोन जास्त गरम होण्याच्या समस्या निर्माण होतात.


● गरम वस्तूंपासून फोन दूर का ठेवावा?

ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा फोन आणि बॅटरी थेट सूर्यप्रकाशात वापरली जाऊ नये आणि तुमचा स्मार्टफोन कधीही गरम वस्तूंच्या जवळ ठेवू नका. यामुळे बॅटरी गरम होऊन फुगू शकते आणि तिचे आयुष्य कमी होतं.


● ऑटो ब्राइटनेस कधी ठेवावा?

आणखी एक गोष्ट म्हणजे ऑटो-ब्राइटनेस पर्याय नेहमी चालू असायला हवा. विशेषतः सूर्यप्रकाशात तुमचा स्मार्टफोन संपूर्ण ब्राइटनेस करून वापरणे टाळा. यामुळे फोनसोबत आपल्या डोळ्यांनाही त्रास होईल.


● चार्जिंग पोर्ट्सची काळजी कशी घ्यावी?

दर तीन किंवा चार दिवसांनी जिथे चार्जर जोडतो ते चार्जिंग पोर्ट स्वच्छ करा. आपण टूथपिक पुढच्या भागावर मऊ कापड टाकू शकता आणि तुमच्या स्मार्टफोनचे चार्जिंग पोर्ट हळूवारपणे स्वच्छ करू शकता.


●  सॉफ्टवेअर अपडेट करावे का?

फोन वापरून २ वर्षे झाल्यानंतर कोणतेही सॉफ्टवेअर अपडेट करु नका. कारण अनेक स्मार्टफोन ब्रँड दोन वर्षांच्या कालावधीनंतर त्यांची उपकरणे बनवणे कमी करतात. इतकंच नाही तर बॅटरी आणि तिची कार्यक्षमताही कमी होते. त्यामुळे तुमचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यापूर्वी, प्रथम बाकी वापरकर्त्यांनी काय मतं नोंदवली आहेत ते पहा.


फोनची बॅटरी ही फोनचा आत्मा आहे. ती जर बिघडली, कमकुवत झाली तर तुमचा फोन काही उपयोगाचा रहात नाही. म्हणून ह्या बॅटरीच काळजी घ्या आणि आपला स्मार्टफोन जास्तीत जास्त काळ वापरा. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा.