सुरुवातीलाच गोंधळ नको असेल तर नात्यात गोष्टी टाळा!

नवीन नवीन नातं सुरू झालं की आपल्या मनात कुठेतरी सतत मी असं वागलो तर तिला काय वाटेल? तो माझ्याबद्दल काय विचार करेल? आमचं नातं टिकेल का ? किंवा अगदी मी फोन करु की नको? असे स्वतः विषयी, त्या व्यक्तीविषयी, नात्याविषयी गोंधळ निर्माण करणारे विविध प्रश्न निर्माण होतात आणि या गोंधळामुळेच नात्यातल्या अगदी साध्या सोप्या, सरळ गोष्टी आपण सुरुवातीलाच कठीण करून टाकतो. नात्याच्या सुरुवातीलाच असा गोंधळ नको असेल तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या लेखात.
स्वतःवर विश्वास ठेवा-
नातं नवीन असताना त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला हवा. विश्वासानेच नातं मजबूत होत जातं. पण सुरुवातीलाच त्या व्यक्तीला गमावण्याच्या भीतीने आपण त्याच्यावर बंधनं ठेवू लागलो तर नातं तुटतं. नवीन नात्यात असताना आपण स्वतःवरही पूर्ण विश्वास ठेवायला हवा. ती व्यक्ती व्यवस्थित न कळल्यामुळे आपण त्यांच्या व स्वतः च्या प्रत्येक कृतीवर चिंता व्यक्त करतो. शंका घेऊ लागतो. आपण बरोबर आहोत की चूक असं द्वंद्व निर्माण होतं आणि आपण नातं बिघडवून ठेवतो. म्हणजे जर आपण त्या व्यक्तीला फोन केला आणि तिने उचलला नाही तर आपल्या मनात स्वतः विषयी हजार शंका निर्माण होतात. त्यावेळी ती व्यक्ती व्यस्त असेल वगैरे लक्षात न घेता आपण  त्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे नसू, प्रेम मिळवण्याच्या लायक नसू असं ठरवून टाकतो जे अजिबात नात्यासाठी योग्य नाही. म्हणून नवीन नात्यात असताना स्वतःवर विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
जसे आहोत तसचं वागावं -
नवीन नवीन नातं असल्यामुळे आपण त्या व्यक्तीचा अंदाज घेत असतो. म्हणजे त्या व्यक्तीला हे आवडत असणार, ते आवडत असणार. आपण असं बोललो तर तिला आवडेल. आपण असं काही केलं तर ती व्यक्ती आनंदी, दुःखी होईल. त्यानुसार स्वतःत बदल करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे स्वतःला आहोत तसे त्या व्यक्तीसमोर ठेवतच नाही. त्यामुळे आपण त्या व्यक्तीला आवडतो की नाही, असा गोंधळ आपल्या मनात निर्माण होतो. नवीन नवीन नात्यात आल्यानंतर त्या व्यक्तीला काय आवडेल, काय नाही असे विचार करत वागण्यापेक्षा आहोत तसं वागलो तर आपला गोंधळ उडणार नाही. आपल्याकडून चूका होणार नाही.
गोष्टी हळू हळू हाताळा -
नातं नवीन असताना त्या नात्याला खुलवण्यासाठी फुलवण्यासाठी एक एक टप्पा पार करायचा असतो. आपण  मात्र त्या व्यक्तीला, आपल्या नात्याला समजून घेण्याची फार घाई करतो. दोन तीन भेटीतच त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व उत्साही, शांत किंवा अजून अशा काही प्रकारचं असेल असं ठरवून टाकतो. सुरुवातीला काही गोष्टी लक्षात येतात त्यावरुनच आपण नात्यात कशी भूमिका ठेवायला हवी हे ठरवतो आणि तसंच वागतो. त्यामुळे दोघांमध्ये सुरुवातीपासूनच अनेक गैरसमज, मतभेद निर्माण होतात. म्हणून नात्याला खुलण्यासाठी थोडा वेळ द्या. त्या व्यक्तीला  पूर्णपणे समजून घ्या लगेचच काही ठरवून नात्यात गोंधळ निर्माण करु नका.
जोडीदाराशी बोला -
नातं नवीन असल्यामुळे आपल्याला एकमेकांविषयी अनेक गोष्टी माहीत नसतात. मग अशावेळी जोडीदार सोडून जाण्याची भीती असते. दोघांचेही स्वभाव भिन्न असल्यामुळे एकमेकांचा एका गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कळत नसतो. मग अशावेळी जोडीदाराला आपली ही गोष्ट खटकते का, आपल्या या सवयीवर त्याचं मत काय आहे, माझं सतत फोन करणं तिला कंटाळवाण वाटत नाही ना, अशा आपल्या शंकांना दूर करण्यासाठी जोडीदाराची बाजू जाणून घेण्यासाठी आपण त्याच्याशी सहजपणे मोकळं होऊन बोलायला हवं. बोलून आपल्यातला गोंधळ सोडवता येऊ शकतो. आपण कधी कसं आणि काय करायला हवं हे कळू शकतं.
अतिविचार नको -
नातं नवीन असल्यामुळे आपण आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कृतीविषयी, त्याने एखाद्या गोष्टीला दिलेल्या प्रतिक्रियेविषयी, संवादाविषयी अगदी टोकाचा विचार करत असतो. हे विचार आपसूकच आपल्या मनात येत राहतात पण आपण मात्र त्या गोष्टींवरून आपलं नातं तुटेल, ती व्यक्ती दुसरं कोणी मिळालं की सोडून जाईल, तिला मी आवडेनासा झालो तर, असा पुढचा अतिविचार करुन आपण स्वतःचा आत्मविश्वास तर गमावून बसतोच. पण अतिविचारामुळेच आपलं नातं सुरुवातीला बिघडवून ठेवतो. म्हणून नात्याविषयी विचार करणं ठीक पण अतिविचार करायचा नाही.
तर या आहेत काही गोष्टी ज्या आपण नात्याच्या सुरुवातीला लक्षात घ्यायला हव्या म्हणजे मग नात्यात एकमेकांविषयी गोंधळ निर्माण न होता नातं उत्तमप्रकारे आपल्याला हाताळता येईल आणि नात्यात लगेचच फूट पडणार नाही.