उगीचच कान फुंकणाऱ्या लोकांपासून रहा सावधान… -
कोणी आजूबाजूला नाही असं पाहून मेघाने वृषालीला सांगितलं, “माया तुझ्या मागे तुझ्याबद्दल बोलत होती.” “काय बोलली?” असं वृषालीने विचारल्यावर ती म्हणाली, "मला तुमच्या दोघीत भांडणे लावायची नाहीत. पण तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस म्हणून तुझ्या कानावर ही गोष्ट घालावीशी वाटली." वृषालीने तिला खूप खोदून विचारल्यावर मेघाने सांगितले, “माया म्हणत होती, वृषाली खूप कुचकट आहे. तिला तिच्या सौंदर्याचा फार गर्व आहे. ती बाकीच्या मुलींना पाण्यात पाहते. असं वागणं बरोबर नाही." तेव्हा मला खूप राग आला. माया माझी चांगली मैत्रीण आहे. ती असं का बोलली म्हणून वृषाली तिला विचारायला जाणार तेवढ्यात मेघाने तिला अडवलं आणि ‘सोड तो विषय,’ असं म्हणाली. दुसऱ्या दिवशी माया आणि वृषालीची भेट झाली. दोघीही लेडीज रूममध्ये फ्रेश व्हायला गेल्या होत्या. वृषाली फ्रेश होऊन लिपस्टिक लावू लागली इतक्यात माया म्हणाली, “जास्त लिपस्टिक लावू नकोस, आधीच इतकी सुंदर दिसतेस. अजून मेकअप करून मुलांना घायाळ करायचा विचार आहे का?”
आता वृषालीला खात्री पटली होती की मायानेच तिच्याबद्दल खोडसाळपणा केला होता. त्याच क्षणी ती मायाला म्हणाली, “मी सुंदर दिसते मग तुझ्या पोटात का दुखतंय. मी कधी तुझ्याशी वाईट वागले का? तू माझ्याबद्दल माझ्या मागे का बोलत असतेस?" यावर काय बोलायचे तिला समजेना. ती म्हणाली, “वृषाली मी नेहमीसारखी आत्ता तुझी मस्करी करत होते. तुझ्याबद्दल तुझ्या मागे बोलण्याइतकी अविश्वासू मैत्रीण नाही मी. जे काही असेल ते मी तोंडावर बोलेन. आणि तुला कोणी सांगितलं की मी तुझ्या मागे काही बोलत होते?” वृषालीने मेघाला समोर बोलावलं. मेघाला जाब विचारला तेव्हा तिची भंबेरी उडाली होती. ती त-त-प-प करू लागली होती. त्यावेळी मेघा खोटं बोलत असल्याचे उघड झालं. मग मायाच वृषालीला म्हणाली, “पाहिलंस? असं कोणी आपलं कान फुंकतं त्यावेळी त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेऊ नये. अशाने तुमच्या जवळची नाती तुमच्यापासून दुरावू शकतात.” झालेला गैरसमज दूर झाला आणि एक चांगलाच धडा वृषालीला मिळाला होता.
आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांना एकमेकांविषयी पाठीमागे बोलण्याची सवय असते. त्याला पण चहाड्या करणं किंवा चुगली करणं म्हणतो. तुमच्याबद्दल कोण काय बोलतंय हे सांगून ती व्यक्ती किती वाईट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ती व्यक्ती करत असते. असे करण्यामागे काही लोकांचा स्वार्थ असतो. तर काही लोकांचा तो स्वभावच असतो. मात्र आपण अशा लोकांपासून सावध असले पाहिजे. कोणी तुम्हाला इतर व्यक्तीविषयी काही सांगितले तर लगेच विश्वास ठेवू नका. कोणीतरी काही बोलले एवढे ऐकून त्या व्यक्तीशी भांडायला जाऊ नका. कोणी तुम्हाला जर असे काही सांगितले तर त्यांना स्पष्ट विचारा तुम्ही मला अमुक व्यक्तीबद्दल का सांगत आहात. तेव्हा त्यांना तुम्ही कोणाच्या जाळ्यात अडकणार नाही हे समजेल.
तसेच तुमचा नात्यावर विश्वास असायला हवा. ज्यांच्या बद्दल तुमचे कान फुंकले गेले ती व्यक्ती कशी आहे हे तुम्हाला माहित असतेच. त्यांच्यासोबत तुमचं असलेलं नातं किती खोल आहे याचा अंदाज तुम्हाला असतो. ती व्यक्ती तुमच्याबद्दल काय आणि किती बोलू शकते हे देखील तुम्हाला समजतेच. मग त्या व्यक्तीविषयी काही सांगितले जात असेल तर तिला समोर बोलावून तुम्ही ते लगेच खरं खोटं करून घ्यायला हवं. त्यावेळी कान फुंकणाऱ्या लोकांचा खरा चेहरा समोर येतो. तुम्हाला सत्य समजते. त्यानंतर ती व्यक्ती कधीच तुमचे कान फुंकायला येणार नाही.
खरंतर अशा कान फुंकणाऱ्या व्यक्तींना आपण टाळायलाच पाहिजे. ज्यावेळी ते तुम्हाला एखाद्याविषयी सांगत असतात तेव्हा त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष द्यायचे नाही. तुम्हाला त्यांचे बोलणे ऐकण्यात रस नाही हे कृतीतून दाखवून द्यायला हवे. मी जेव्हा माझ्या डोळ्यांनी पाहीन आणि कानाने ऐकेन आणि त्याचीही शहानिशा करेन तेव्हाच मला विश्वास बसेल हे वाक्य अशा व्यक्तींना ठणकावून सांगा. त्यामुळे तुम्ही सहजासहजी फसणाऱ्यातले नाही हे त्यांना कळून जाईल. काहीजण आपले काम काढून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमच्यापासून दुरावण्यासाठी त्यांच्याविषयी तुमचे कान भरतात. तुम्ही तुमच्या मतांवर आणि विचारांवर ठाम असता हे त्या व्यक्तीला वेळीच दाखवून द्या म्हणजे तुमचे कान फुंकायला कोणी येणार नाही आणि तुमचे तुमच्या प्रियजनांशी असलेले नाते दुषित होणार नाही. बरोबर ना? तुम्हालाही पटलं ना! मग असा अनुभव तुम्ही सुद्धा घेतला असेल तर आमच्या सोबत नक्की शेअर करा.
0 टिप्पण्या