लग्न तुटू न देता, वैवाहिक जीवन आनंदी कसे बनवाल? 


लग्न म्हणजे दोन व्यक्तींच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस. या दिवशी दोन जीव मनाने, शरीराने, नात्याने एकत्र येतात. हे फक्त या दोघांचं मिलन नसतं त्यांची कुटुंबे एकमेकांशी आयुष्यभरासाठी जोडली जातात. हे नातं आयुष्यभरासाठी जरी असलं तरी सर्वच जण हे नातं आयुष्यभर खरंच टिकवतात का हा प्रश्न मनात येतो. अवघ्या काही महिन्यात किंवा चार दोन वर्षातच लग्न तुटताना, आयुष्यभरासाठी जोडलेली नाती क्षणार्धात संपुष्टात येताना आपण पहात असतो. पण असं का होतं? अनेक जण लग्नाची स्वप्न रंगवत असतात. तरीही लहानसहान कारणांनी ही नाती का संपतात? तर हे लग्नाचं नातं तुम्हाला आयुष्यभरासाठीचा आनंद, प्रेरणा देणारं हवं असं वाटत असेल तर आजचा लेख तुमच्यासाठीच आहे.

लग्न तुटण्याची कारणे -
१. जोडीदाराचा अनादर
लग्न हे दोन जीवांचं मिलन असतं असं आपण म्हणत असलो तरी ते टिकण्यासाठी दोघांमध्ये प्रेम, आपुलकी, माया असावी लागते. तसेच एकमेकांच्या इच्छेचा, निर्णयाचा मान राखणं, त्यांचा आदर करणं आवश्यक असतं. जेव्हा दोघांपैकी एक किंवा दोघेही एकमेकांचा अनादर करतात, त्यांच्या इच्छांना डावलतात तेव्हा नात्यात कटूता निर्माण होते. जोडीदारांनी एकमेकांची कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या नीट समजून घेतल्या नाहीत तर विश्वास, सन्मान, प्रेम यावर परिणाम होऊन नातं विस्कळीत होतं.
२. सततची भांडणं -
जिथे नातं येतं तिथे प्रेम असतं आणि प्रेम म्हटलं की भांडणसुद्धा. लहानसहान भांडणं होणं ही स्वाभाविक गोष्ट असली तरी त्यात सातत्य आलं की नात्यातील गोडवा निघून जातो. सतत एकमेकांवर आरोप करणे, तक्रार, कुरबुरी यामुळे चिडचिड होऊन खटके उडतात. रोजच्या या कटकटीपासून सुटका म्हणून लग्न तोडणे हा सोपा मार्ग वाटू लागतो.
३. जुन्या गोष्टी उगाळणं -
वाद, भांडणं होणं ही सामान्य गोष्ट असली तरी अनेकांना झालेल्या गोष्टी परत परत उगाळून काढून जोडीदाराला टोमणे मारायची वाईट सवय असते. जे घडून गेलं आहे त्याची सतत आठवण या निमित्ताने करून दिली जाते आणि मग परत त्याच गोष्टी समोर आल्याने वाद विकोपाला जाऊन त्याला अजून फाटे फुटू लागतात.
४. वैयक्तिक गोष्टी दुसऱ्यांना सांगणं -
जोडीदारासोबत असलेलं नातं हे खूप वैयक्तिक असतं. ते कोणासोबतही शेअर करायचे नसतं. पण वाद, भांडणं झाली की नेमक्या ज्या गोष्टी बोलायच्या नसतात त्याच घरात कोणासोबत किंवा मित्र मैत्रिणीशी बोलल्या जातात. यामुळे विश्वास, प्रेम यांना तडा जातो. आपल्या गोष्टींची अशी गावभर झालेली चर्चा कोणालाही आवडत नाही. त्यामुळे नाते तुटण्याला हे कारण पुरेसे आहे.
५. इतरांशी तुलना -
बऱ्याच जोडप्यांना इतरांच्या नात्यांकडे पाहून तुलना करण्याची सवय असते. आपण सगळीच वेगळी माणसं असल्याने प्रत्येकाच्या गोष्टी या वेगवेगळ्या असतात. अशावेळी तुलना केल्याने समोरच्या व्यक्तीला ‘तू किती कमी कमावतोस, तू कसा साधाच राहतोस, तू कशी अजागळ राहतेस, तुला जगाची माहिती नाही,’ असे टोमणे मारून त्याला किंवा तिला खाली पडण्याचा प्रयत्न केला जातो. जोडीदाराला हवा तो मान दिला जात नाही आणि त्यामुळे त्याला कमी लेखले जाते.
६. जोडीदाराचा स्वभाव -
सगळ्या गोष्टींचे मूळ हा स्वभावच असतो. अनेक जणांना उगाच प्रत्येक वेळी बॉसगिरी करण्याची सवय असते. यातून प्रत्येक वेळी टोचून बोलणे, सतत सल्ले देणे, हक्क गाजवणे या गोष्टी घडतात.
ही सगळी लग्न तुटायची कारणं झाली. पण जर आपल्या लग्नाला सर्वार्थाने आनंदी बनवायचं असेल तर खालील गोष्टी निश्चितपणे करा -
 प्रामाणिकपणा -
कोणत्याही नात्यात प्रामाणिकपणाला विशेष महत्व असते. त्यात वैवाहिक नातं सुखी राहावं असं वाटत असेल तर कधीच कोणत्याही गोष्टी एकमेकांपासून लपवता कामा नये. जे असेल ते अगदी विश्वासाने प्रामाणिकपणे सांगायला हवे.
 प्रेम -
प्रेम तर सगळ्याच नात्यांना बांधून ठेवणारी गोष्ट आहे. ज्या नात्यात प्रेम असतं त्यात जोडीदार एकेमकांसाठी अनेक गोष्टी आवडीने करतात. काळजी, चिंता या सगळ्या गोष्टीतून प्रेम दिसून येते. लग्नानंतर काही वर्षांनी थॅंक यु, मिस यु आणि आय लव्ह यु कुठे हरवतात कळत नाही. आपल्या जोडीदाराला नेहमी हे वाटू द्या की तो / ती स्पेशल आहे.
सन्मान
आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्याचे वचन देताना दोघांचे एक स्वतंत्र अस्तित्त्व आहे हे लक्षात घ्यायला हवे. लग्नाला कितीही वर्षे उलटली असली तरी एकमेकांचा आदर, सन्मान हा वेळोवेळी करायलाच हवा. लग्न टिकवताना एकमेकांना सन्मान दिला तर नात्याची गोडी वाढते.
अपेक्षा -
खुप जास्त अपेक्षा ठेवल्याने गोष्ट बिघडू शकते. आपल्या पार्टनरकडून अशा अपेक्षा ठेवा ज्या वस्तुस्थितीला धरून असतील, अवास्तव अपेक्षा ठेऊ नका. असाधारण गोष्टी त्यांना करायला लावू नका आणि तुम्हीही करू नका. छोट्या मोठ्या भांडणांना वैयक्तिक घेऊ नका. जिथल्या तिथे कटुता वाढवणाऱ्या गोष्टी सोडून द्या.
संवाद -
लग्न टिकवण्यासाठी संवाद खूप गरजेचा असतो. संवाद नातं खुलवतो, कटुता कमी करतो, विश्वास वाढवतो, प्रेम निर्माण करतो. वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी दोन व्यक्तींचे मोकळंढाकळं बोलणं आवश्यक असतं आणि ते संवादानेच शक्य होतं.
वैवाहिक सुख, इच्छा -
दोन लोकांमध्ये प्रेम निर्माण होऊन त्यांना शारीरिक सहवासाची इच्छा निर्माण होते. लग्न टिकवण्यासाठी वैवाहिक सुख ही गोष्ट आवश्यकच असते. त्यामुळे जोडीदाराची मर्जी राखणं, इच्छा पुरवणं, त्याला समजून घेणं, तडजोड करणं या सगळ्या गोष्टी केल्या की लग्न आनंदी होतं.
या होत्या लग्न टिकविण्यासाठीच्या अतिशय महत्वपूर्ण गोष्टी. या टीप्स वापरून लग्नाचे प्रेमळ नाते टिकवा. फुलवा, बहरवा. दोघांचं जीवन अर्थपूर्ण व समृद्ध करा आणि हो, हा लेख आवडला असल्यास आपला अभिप्राय देण्यासही विसरू नका.