प्रेमाच्या खऱ्या नात्यात असतात 'या' गोष्टी - 
प्रेम करावे लागत नाही तर ते व्हावे लागते. एखाद्या व्यक्तीवर आपले खरे प्रेम आहे हे जसे आपल्याला काही गोष्टींवरून समजते. तसेच समोरची व्यक्ती देखील आपल्यावर निखळ प्रेम करत आहे का हे आपल्याला जाणून घ्यायचे असते. काहीजण प्रेमाच्या नावाखाली तुमच्यासोबत भावनिक खेळ खेळतात. तर काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्यासोबत प्रेमात असतात. या गोष्टी तुम्हाला समजल्यावर धक्का बसतो. त्यामुळे प्रेमात पडण्याची घाई अजिबात करू नका. तर खरे प्रेम मिळवण्यासाठी खाली सांगितलेल्या गोष्टी करून बघा.

१. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं कितपत जमतं?
प्रेमाच्या नात्यात आपल्यासाठी जोडीदार महत्वाचा असतो. जोडीदाराशी असलेले बंध किती घट्ट आहेत यावर तुमचं नातं टिकून राहतं. त्यामुळे तुमच्या दोघांमधील ट्युनिंग छान असावं लागतं. तुमचे स्वभाव एकमेकांना आवडायला लागतात. तुमचे विचार आणि मते एकमेकांशी किती पटतात हे देखील पहायचे असते. या सर्व गोष्टींमधून तुम्हाला एकंदरीत अंदाज येतो तुमचं जोडीदाराशी जमणार आहे की नाही. तुम्हाला जर त्यांनी तुमच्या गुण दोषांसहित स्वीकारून आपलेसे केले आणि तुमच्याशी जमवून घेतले तर त्यांचे तुमच्यावर प्रेम आहे हे समूजन जा.

२. तुमचा जोडीदारावर किंवा जोडीदाराचा तुमच्यावर किती विश्वास आहे?
प्रेमाचं नातं हे पूर्णपणे विश्वासावर अवलंबून असते. तुमच्या नात्यात जर विश्वास असेल तर ते कायम तग धरून राहते. मात्र विश्वासाचा पायाच जर कमकुवत असेल तर नातं डगमगायला वेळ लागत नाही. त्यामुळे जोडीदार तुमच्याशी प्रामाणिक आहे का हे पहा. तो किंवा ती तुमच्याशी कधी खोटे बोलतात का? कोणत्या गोष्टी तुमच्यापासून लपवतात का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती असणे गरजेचे असते. जोडीदार जर विश्वासू असेल आणि तो किंवा ती तुम्हाला प्रत्येक गोष्ट कोणताही आडपडदा न ठेवता सांगत असतील तर ते तुमच्यावर खरं प्रेम करतात हे यातून सिद्ध होते. त्यामुळे नात्यात विश्वास निर्माण करा.

३. तुम्ही दोघे किती दिवसापासून एकत्र आहात हे पहा ?
पंधरा दिवसांच्या प्रेमात दोघेजण पूर्ण आयुष्याची स्वप्नं बघून मोकळे होतात. प्रेमात पडणे आणि ते शेवट्पर्यंत टिकवणे सोपे नाही. त्यामुळे प्रेमात पडल्यावर नात्याला वेळ देणे आवश्यक असते. एकमेकांसोबत तुम्ही किती दिवसापासून आहात यावर तुमचे प्रेम किती खरे आहे ते समजते. काही जण दहा वर्षांच्या नात्यानंतर लग्नाच्या बंधनात अडकतात. म्हणजे त्यांना एकमेकांचा इतक्या वर्षांचा सहवास लाभलेला असतो. यावरून त्यांचे प्रेम खरे होते म्हणून ते टिकले हे निष्पन्न होते. त्यामुळे नात्याला वेळ द्या.

४. तुम्ही दोघेही एखादा कठीण प्रसंग कसा हाताळता?
नात्यात छोट्या मोठ्या गोष्टींवरून सुद्धा जोडीदार खरे प्रेम करतो का हे समजून येते. प्रेमात पडल्यावर कधी ना कधी घरी ही गोष्ट समजते. मात्र ती तुमच्या परस्पर घरच्यांना समजली आणि त्यांनी जर तुमच्या जोडीदाराला धमकावले तर तो तुम्हाला सोडून देतो की नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करतो हे बघणे आवश्यक असते. जोडीदार जर नात्यातून पळ काढून निघून गेला तर तो तुमच्यावर खरे प्रेम करत नव्हता हे कळण्या इतपत तुम्ही प्रगल्भ असता. त्यामुळे कठीण प्रसंगांमध्ये एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करावा.

५. तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये कसे राहता?
प्रेमात पडलेल्या जोडप्यांसाठी लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप खूप कठीण असते. एकमेकांपासून दूर राहून प्रेम टिकवताना त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. जोडीदार प्रामाणिक आहे का? तो वेळ देतो का? भावनिक जवळीकता किती खोल आहे हे समजणे अवघड असते. त्यामुळे जोडीदार तुमच्याशी किती संपर्कात असतो यावरून त्याचा प्रामाणिकपणा कळतो. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तो सांगत असेल तुम्हाला भेटायला महिन्या किंवा दोन महिन्यातून वेळ काढत असेल तर त्याची भावनिक जवळीकता सुद्धा जास्त आहे हे यावरून समजते.
तुमच्या नात्यात या गोष्टी आहेत का ? नसतील तर आधी त्या नात्यात आणण्याचा प्रयत्न करा तरच तुम्हाला तुमचे खरे प्रेम मिळेल.