आदर्शवत जीवन जगण्यासाठी काय करावे? -
आपण सगळेच कोणाचा ना कोणाचा आदर्श घेत जगत असतो. एखाद्याची अदबशीर देहबोली, एखाद्याने गाठलेलं उंच यश, एखाद्याची माणुसकी असं काही ना काही आपल्याला भुरळ घालत असतं. इतरांमधल्या या गोष्टींवर जसं आपण लक्ष देतो तसंच इतर लोकंही आपल्या वर्तणुकीकडे, व्यक्तिमत्वाकडे लक्ष देत असतात. त्यामुळेच आपल्या वागण्या – बोलण्यातही अशी अदब असावी ज्याचा आदर्श इतर लोकं घेऊ शकतील.
आपल्याकडे कोणीतरी बघत आहे, हे मनात ठेवून आपली वागणूक असावी असं म्हणलं जातं. या वाक्याचा अर्थ असा की नेहमी, विशेषतः सामाजिक ठिकाणी आपली वागणूक व्यवस्थितच असली पाहिजे. लोकं आपल्याकडे बघतात तेव्हा आपण कसं वागतो तशीच वागणूक सहसा असली पाहिजे. आपलं बोलणं, चालणं, प्रत्येक कृती कोणी ना कोणी बघत असतं. त्यातून आपली चांगली किंवा वाईट अशी प्रतिमा त्यांच्या मनात तयार होत असते. आपल्याला अर्थातच इतरांमध्ये आपली चांगली प्रतिमा तयार व्हावी असं वाटत असल्याने आपली वागणूक सुसंस्कृत असली पाहिजे. इतर लोकं काही वेड्यासारखं, अनैतिक वागत असतील तर आपण त्यांच्यामध्ये न अडकता आपला आदर्श लोकांनी का घ्यावा याचा विचार करणं आपल्या स्वतःच्या हितासाठी महत्त्वाचं ठरु शकतं.
काही दिवसांपूर्वी आमच्या परिसरात खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. वेगवेगळ्या लोकांशी ओळख होण्याची चांगली संधी आम्हाला या स्पर्धांमुळे मिळाली आणि काहींशी ओळख झाली नसली तरी आपल्या उत्तम खेळामुळे ते आमच्या लक्षात राहिले. खेळामध्ये आपण हरलो तरी आपली देहबोली शांत, संयमीच असली पाहिजे असा अनुभव आम्हाला काही मुरलेल्या खेळाडूंकडे पाहून आला. त्यांची नावं वगैरे काही कळली नाही पण आयुष्यात नकारात्मक प्रसंग आला तरी कसं त्या प्रसंगाला सामोरं जावं, स्वीकारावं हे मात्र आम्हाला कळलं. त्या खेळाडूंना कळलंही नसेल की त्यांची वर्तणुक आमच्यासाठी किती आदर्श ठरली. तेव्हा हे प्रकर्षाने लक्षात आलं की आपलीही वागणूक समाजात लोकांनी आदर्श घ्यावा अशीच असली पाहिजे. कोणीतरी आपल्याकडे पाहत आदर्श घेतंय याची जाणीव ठेवण्याची शिकवण मला या प्रसंगातून मिळाली.
प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे आपला आदर्श लोकांनी घ्यावा यासाठी काही विशिष्ट चौकट तयार केलेली नाही. ती आपण आपल्या पद्धतीने बनवायची असते. साधारणतः नैतिकता, संयम, नम्रपणा, समजूतदारपणा, आयुष्य आणि ध्येयाविषयीची स्पष्टता असे काही गुण एका आदर्श व्यक्तीमध्ये दिसून येतात. स्वतःचं अस्तित्व जपण्याबरोबरच इतरांचं अस्तित्व मान्य करण्याचा मोठेपणा त्यांच्यात असतो. शिवाय ज्यांची वर्तणुक सर्वसमावेशक असते अशी माणसं आपल्या सगळ्यांनाच फार आवडतात. ते स्व केंद्रीत नसतात, इतरांचा विचार करतात हे पाहून आपल्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण होतो. सगळ्यांना सामावून घेत, समजून घेत वागणारा माणूस समाजाला आदर्श वाटतो. मग हाच आदर्श आपल्याकडून लोकांनी का घेऊ नये?
जर माझ्यासारखीच व्यक्ती माझ्यासमोर उभी असेल तर मी त्याच्याकडून काय आदर्श घेईल हा विचार करुन गरज असेल तिथे आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करता आली पाहिजे. जसं, आपल्याकडे ज्ञानाचा साठा आहे, छान बोलता येतं पण सतत पान खाण्याची सवय असेल आणि तोंडात पान ठेवूनच आपण ज्ञान देत असू तर लोकांना आपली हुशारी कधीही आकर्षक, आदर्श वाटणार नाही. पण कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर बोलताना आपण काहीही खाणं – पिणं टाळत असू, केवळ आपल्या शब्दांवर लक्ष देऊन विचारपूर्वक बोलत असू तर आपल्यासारखी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न लोकांकडून सुरु होईल. आपल्या बारीक बारीक हालचालींवरुन आपल्या व्यक्तिमत्वाचा निकाल लोकं लावत असतात. हा निकाल आपल्याला नापास तर करणार नाही ना याची काळजी आपण घेतली पाहिजे.
हल्ली अनेक प्रेरणादायी माणसांचे व्हीडिओ, यशस्वी माणसांच्या मुलाखती आपल्याला सहज बघायला मिळतात. ही माणसं आपल्याला समाजासमोर कसं सादर करतात याचा अभ्यास करुन आपणही आदर्शवत होऊ शकतो. त्यासाठी फार काही मेहनत घेण्याचीही आवश्यकता नाही पण स्वतःमध्ये बदल घडवण्याची तयारी मात्र असलीच पाहिजे. लोकं आपला आदर्श घेतात हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा मिळणारं समाधान हे कित्येक पटींनी जास्त असेल.