खिडकितले पाहुणे..





माझ्या किचनच्या खिडकित एकदा एक कावळा आला. माझे लक्षच नव्हते.. मी आपली गाणी ऐकत पोळ्या लाटत होते.. अचानक खिडकिवर टकटक झाले.. मी दचकलेच..परत त्याने टकटक केले.. कालची पोळी काही शिल्लक आहे का बघुन हळुच खिडकितुन बाहेर ठेवली.. तोवर तो शांत बसला.. परत टकटक ऐकु आली.. आता काय हवे बाबा.. म्हणत मी पाहिले तर अजुनही टकटक आणि काव काव चालुच... मग एका भांड्यात पाणी दिलं ... आश्चर्य म्हणजे माझी हालचाल पाहुत तोपर्यंत बरोब्बर शांत बसला होता.... मग त्याने ती पोळी पाण्यात बुडवली ..मऊ केली.. पाणी प्यायला आणि पोळी घेऊन ऊडुन गेला.. आम्हाला सगळ्यांनाच भारी कौतुक वाटले..
आता तर त्याची सवयही झाली... बऱ्याचदा तो त्याच्या वेळेनुसार येतो काचेवर टकटक करतो.. खाऊ घेतो आणि ऊडुन जातो.. पण साहेबांना कधी फरसाण ,कधी गोडधोड, कधी शेव चिवडा हवा असतो..शिळी भाकरी तर आज्जिबात खात नाही..
सासुबाई म्हणतात, नको बाई सवय लावुस.. आपण कधी नसलो म्हणजे कुठे जाईल.. मग मी म्हणायचे.. देणं असेल हो कुठलंतरी.. जोवर शक्य आहे तोवर देऊयात.. नसताना त्याची सोय पाहायला तो वर बसलाच आहे ना.. सध्या तरी त्याने ते काम आपल्यावर सोपवलेय तर ते पार पाडुया..