किती दिवसांनी माझा एक जुना मित्र आज भेटला. तो परभणीला रिकाम टेकडी पोस्ट कार्यालयात प्रमुख या पदावर कित्येक दिवसांपासून कार्यरत आहे.
प्राथमिक विचारपूस होईस्तोवर आमचा चहा आला. पण मला सारखी एक गोष्ट खटकत होती. तो हो ला हो आणि नाही ला नाही, अशा प्रकारे उत्तर देत होता. एव्हढा मनमोकळ्या गप्पा मारणारा माझा मित्र असा अचानक कसा गुमसूम झाला, म्हणून मी सरळच विचारले....
"का रे बाबा, काही टेंशन आहे का..? अगदीच हिरमोड झाल्या सारखा दिसतो आहेस? काही नोकरीत अडचण आहे की काय...?"
"नाही रे तस काही नाही"
"तरी म्हटलं, चांगली केंद्र सरकारची नोकरी, सातवा वेतन आयोग लागू, सर्व सुविधा, माहिती अधिकार नाही, भानगडी नाहीत, एकदम अलिप्त कामकाज, इकडले टपाल तिकडे... तिकडले इकडे.... एव्हढेच काम... बरे कुणाला द्यायचे पत्ता पण दिलेला असतो... तिकिटे लावलेली असतात.... मग काय अडचण... घरी काही प्रॉब्लेम आहे का....? " मला राहवेना....
" घरी सगळे मजेत आहेत रे पण मलाच अशात मनःशांती नाही. सारखे कुणी तरी माझ्या विरूद्ध कट रचतो आहे... अशी भिती वाटते. रोजरात्री, कुणीतरी पत्रकार परिषद घेऊन, माझ्या विरूद्ध भयानक आरोप करतय, अशी स्वप्ने पडतात.... "
" काय.... तू असे कोणते चूकीचे काम करू शकतो? मनात आणले तरी, तुझ्या नोकरीत तू काही कुणाचे वाईट नाही करू शकत.... " मी विश्वासपूर्वक बोललो...
" ते खरे आहे. पण बोलणा-या च्या तोंडावर हात कोण धरणार?
माझ्या कार्यालयातून काळा पैसा दुबई ला मनी आर्डरने जातो , आयपीएल च्या आधी एका विशिष्ट ठिकाणी हजारो तार केल्या गेल्या, पोलीस धाड टाकण्या पूर्वी माझ्या कार्यालयातून पत्र टाकून गुन्हेगाराला सावध केले जाते, राष्ट्र विरोधी माहिती बंद लिफाफ्या मधून शत्रू राष्ट्राला पुरवली जाते, पार्सल कमी वजनाचे दाखवून करोडोंची हेराफेरी केली, पोस्टमन लोकां कडून शहरातील भाजी मार्केट, दारूची दुकाने, ईत्यादी ठिकाणी रेकी केली ....आणि या सर्वांवर मी ठप्पे मारतो, म्हणून माझा पण त्यात सहभाग असल्याचा सबळ पुरावा आहे... असे नाना प्रकारचे आरोप पत्रकार परिषदेत केलेले मला स्वप्नात दिसतात. वरून पुन्हा फलाण्या दिवशी आणखीन बाॅम्ब फोडण्याची धमकी पण देतात... रे..... माझी तर झोपच उडाली बघ.... "
विषय माझ्या लक्षात आला म्हणून मी मित्राला ओळखीचे डॉक्टर कडे घेऊन गेलो. सर्व प्रकार डॉक्टरांना मीच सांगितला. डॉक्टरांनी अतिशय गंभीर चेहरा करून, प्रिस्क्रीप्शन लिहून दिले. कोणत्या गोळ्या कशा घ्यायच्या हे सांगितले नंतर मित्राला बाहेर बसण्यास सांगून, माझ्या जवळ येत डॉक्टर म्हणाले....
"शक्यतो यांचे घरचा टिव्ही काही दिवस बंद ठेवा...किंवा फक्त पोगो, कार्टून नेटवर्क, डिस्ने सब टिव्ही असेच चॅनल ठेवा.... . तरच या गोळ्या लागू पडतील... नाही तर मित्राला येरवड्याला भरती करावे लागेल.....!"
मी माझ्या घरी गेलो. मित्र मित्रा कडे गेला. घरी गेल्यावर मी वहिनींना फोन करून डॉक्टरांनी सांगितलेली सुचना सांगितली....
वाट पाहतोय.... मित्राचे तब्येतीत सुधारणा किती झाली..... याचा निरोप येण्याची.....!!
विनंती आहे.... तुम्ही पण सदिच्छा असू द्याव्यात...!
0 टिप्पण्या