आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय महत्त्वाचे आहे? ह्या प्रशनाचे उत्तर केवळ दोनच शब्दात आहे असं मला वाटतं.आणि ते प्रत्येकाच्या आयुष्याला घडविण्याचे अथवा बिघडविण्याचे काम करतात. ते दोन शब्द आहेत...स्वतःवरील विश्वास.लहानपणी अभ्यास करून चांगल्या गुणांनी पास होणे असो,कोणत्याही खेळात प्राविण्य मिळवून चांगले खेळणे असो,
नोकरीत आपल्या चांगल्या कामाने बढती मिळणे असो,एखादा छान अशा कलाक्षेत्रात काम करताना त्यात यश मिळविणे असो ,प्रत्येकवेळी महत्त्वाचा आहे स्वतःवरील विश्वास.जसं चांगले करताना तो गरजेचा आहे त्यापेक्षा तो वाईट गोष्टीपासून दूर राहताना अधिक महत्वाचा आहे. आजच्या जमान्यात कोणत्याही अतिरेकी व्यसनापासून मुक्ती मिळवायची असेल तो असावा लागतो.माझ्या साठ वर्षाच्या आयुष्यात दारू पिणं हे मला कधी पटलचं नाही. दारू पिणं किंवा ड्रिंक्स घेणं चांगले का वाईट यावर वेगळी चर्चा होऊ शकेल.पण स्वतः वरती विश्वास असेल तर कितीही प्रलोभने आली तरी ,कितीही मित्रांनी गळ घातली,कितीही वाईट परिस्थिती जीवनात अनुभवावी लागली, तरी त्या मार्गाला मी जाणार नाही हे एकदा मनाशी पक्कं असलं ना मग आपल्याला आपल्या निश्चयापासून कुणीही डळमळीत करू शकत नाही. नोकरीच्या ३४वर्षाच्या काळात किती वेळा पार्टीजला गेलो.काही मित्रांनी आँफरही दिली. सिनीयर लोकांनी आग्रहपण केला पण मी कधी वश झालो नाही आणि आज गर्वाने नव्हे तर अभिमानाने सांगेन मी आयुष्यात ड्रिंक्स घेतली नाही म्हणून. लग्नानंतर पाच वर्षात नक्की माणूस दारू पितो असे माझ्यापेक्षा सात वर्षे मोठ्या असलेल्या मित्राने एकदा मला ऐकवले होते.पण निग्रहच एवढा होता की लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी माझी पाठ थोपटली.काम करतानासुद्धा आपला आपल्यावर विश्वास असेल तर अशक्य अशी कामे चुटकीसरशी होतात हे मी अनुभव केले आहे.सार्याच गोष्टी नियमानुसार नाही करता येत.मँनेजर म्हणून काम करताना मी साहेब या शब्दापेक्षा माणूस म्हणून जास्त वागलो.अडाणी, न शिकलेल्या अशा कामगारांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून वेगवेगळी मशीन्स चालवली. काहींना बचतीचा मार्ग दाखवून पोस्टाची रिकरींग खाती काढली.काहींना रिपोर्ट लिहायला शिकवले. त्यांच्या मनात एकदा स्वतः वरील विश्वासाची जाणीव त्यांना करून दिली की अशक्य ते शक्य होतं.आणि हे सगळे मी साध्य करू शकलो ते केवळ माझा माझ्यावर असलेल्या विश्वासामुळेच.हे मात्र शंभर टक्के सत्य आहे.
0 टिप्पण्या