“त्याचा स्वभाव बदलला आहे. आता पूर्वी प्रमाणे तो मनमोकळा संवाद साधत नाही. का कोण जाणे आता त्याला माझ्यासाठी वेळ नसतो. गेले पाच वर्षे आम्ही सोबत आहोत. पण त्याचा बदललेला हा स्वभाव पाहिला, की भीती वाटते. कंटाळा तर नसेल आला ना त्याला आमच्या नात्याचा? आला असेल तर काय करायचं मी? त्यामुळे बऱ्याचदा त्याच्याशी बोलताना काय बोलावं हेच मला कळत नाही", शिवानी ऋचा सोबत बोलत असते. शिवानी आणि हृषीकेश यांचं एकमेकांवर प्रेम असतं. गेली पाच वर्षे ते सोबत असतात आणि आता कुठे दोघेही स्थिरस्थावर होत असतात. त्यामुळे आता या नात्याला लग्नाचं बंधन घालायला हरकत नाही. पण इथे शिवानीला भीती वाटू लागते. 'नात्याचा कंटाळा तर नसेल ना आला हृषीकेशला?' त्यासाठी शिवानी आपली बालमैत्रिण ऋचाकडे येते. तिच्याकडून काही सल्ला मिळतोय का? या भीतीला सामोरे कसे जावे? अशा प्रश्नांची उत्तरे तिला ऋचाकडून अपेक्षित असतात.
मन असे दोन्ही बाजूंनी आपल्या पार्टनर सोबत असायला हवं. नात्यात कधीच काही घडत नाही, काही वेगळं करावं असं वाटत नाही परिणामी नातं कंटाळवाणे होऊन जाते. हे नियम सर्वच नात्यांना लागू होत नसले, तरी यामुळेच नातं कंटाळवाणे झाले अशी भीती दाटून येते. बहुतांश प्रसंगी ही भीती अवास्तव असते. ही भीती दाटून येण्याचं कारण नसताना देखील आपण घाबरतो. तर काहीवेळा या भीतीला सबळ कारणे असतात. तर अशाच भीतीचे निवारण ऋचा करेल असा विश्वास शिवानीला असतो.
"तू फारच टेन्शन घेतेस बघ. एवढा विचार करण्याची काहीच आवश्यकता नाही. पण ही भीती नष्ट करण्यासाठी मी सांगते तेवढं कर म्हणजे तुझ्या मनाची ही घालमेल थांबेल", ऋचा सांगू लागते. हे बघ, तू मला सांग हृषीकेश सोबत तू प्रामाणिक राहतेस? नक्कीच राहतेच. तोही तुझ्यासोबत तितकाच प्रामाणिक असणार. तुमचा प्रामाणिकपणा हेच तुमच्या नात्यातील पहिली जमेची बाजू आहे. तुला जर वाटत असेल की नात्यात कंटाळा येतोय, काही नवीन घडत नाहीये. मग तू प्रयत्न कर त्यासाठी. कधीतरी हृषीकेशला सरप्राईज देण्याचा प्रयत्न कर. ते सरप्राईज त्याला आश्चर्याचा धक्का देईलच त्याशिवाय त्यालाही तुला सरप्राईज देण्यासाठी उद्युक्त करेल. आणि हे बघ कोणतंही नातं असलं, तरी त्यात दोघांना मोकळा श्वास घेता यायला हवा. नातं म्हणजे जोखडात बांधलेले दोन जीव नव्हेत. स्वतंत्र दोन जीवांनी एकमेकांना सोबत करत पुढे जाण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे नातं. त्यामुळे हृषीकेशच्या स्वातंत्र्यावर गदा येईल असं काही तू करू नकोस. जितकं वातावरण मोकळं ठेवता येईल तितकं ठेव. आणि हो कधीतरी बाहेर देखील जात जा. तुम्हाला तुमची पहिली डेट आठवते?", शेवटी ऋचा विचारते त्यावर शिवानी होकारार्थी मान हलवते. पुढे ऋचा अजून एक प्रश्न विचारते, "शेवटच्या डेटवर कधी गेला होतात?" यावर मात्र शिवानी विचारात पडते. "आता असं बाहेर देखील पडत चला. रोज तेच करून कंटाळा येत असणार. त्यामुळे त्याची भीती तुला वाटते अजून काही नाही", ऋचाचे आभार मानत शिवानी बोलू लागते, "हे सर्व अमलात आणेन. आणि आता पुढच्या आठवड्यात भेटू तेव्हा कळेलच काही बदल घडतो आहे का ते!" पुढल्या आठवड्यात जेव्हा शिवानी आणि ऋचा भेटतात तेव्हा अपेक्षित बदल घडलेला असतो. त्यामुळे पुन्हा एकदा शिवानी ऋचाचे आभार मानते.
थोडक्यात काय कंटाळा निर्माण होतोय अशी भीती निर्माण होऊ नये म्हणून प्रामाणिक रहा, पार्टनरला सरप्राईज देण्याचा प्रयत्न करा, वातावरण बदल शक्य असेल, तर करा आणि एखादा दिवस बाहेर घालवा. जितकं नातं स्पष्ट आणि खेळत असेल तितका कंटाळा येण्याची शक्यता कमी आणि कंटाळा नाही म्हणजे भीती नाही.
0 टिप्पण्या