स्त्री आणि पुरुष समानतेचा नारा देणाऱ्या जगात समाज खरंच स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं स्वीकारतोय का हा एक प्रश्नच आहे. पुरुष आणि महिला एकमेकांच्या बरोबरीनेच आहेत असे आपण नेहमी म्हणतो पण जेव्हा खरंच प्रत्यक्षात असे घडते तेव्हा स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. किंवा त्यांना तू काय पुरुषांची बरोबरी करू लागलीयेस स्वतः एक बाई आहेस हे मात्र विसरू नकोस असे बोलून तिच्या स्त्री असण्याची जाणीव तिला करून दिली जाते. बाईने जर घराची जबाबदारी घेतली, तर ती पुरुषाची बरोबरी करून स्वतःच बाईपण विसरत नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
कीर्तीच्या लग्नाला जवळपास २० वर्षे झाली होती. दोन मुले, नवरा-बायको असा छान संसार तिचा सुरु होता. एका मोठ्या आयटी कंपनीत उच्च पदावर ती नोकरी करत होती. नवऱ्याची पोस्टींग आसामला झाल्याने गेल्या बारा वर्षांपासून ती एकटी खंबीरपणे तिचं कुटुंब सांभाळत होती. सकाळी ऑफिसला जायचं, संध्याकाळी घरी येऊन मुलांसोबत वेळ घालवायचा त्यांना काय हवं नको ते पाहायचं. घरात एखादी गोष्ट नसेल, तर सासू तिलाच सांगायच्या. घरात कोणता निर्णय घायचा असेल तरी सर्वप्रथम तिला विचारले जाई. कारण त्याघरातील कर्ती व्यक्ती तीच होती. पण ही गोष्ट तिच्या नातेवाईकांना काही आजूबाजूच्या लोकांना खटकत असे. नोकरी करते घर सांभाळते म्हणून हिला वाटतंय ही घरातला पुरुष झालीये. नवरा कामासाठी बाहेर आहे म्हणून हिच्या हातात घर आलंय नाहीतर हिला कोण विचारताय. बाईने आपली मर्यादा सांभाळून राहावं. घराची जबाबदारी घेतली म्हणजे ती पुरुषाची बरोबरी करू लागली असे होत नाही. लोकांच्या या टीकांकडे दुर्लक्ष करून कीर्ती आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आनंदाने राहत आहे.
एखादी महिला जर कणखरपणे पुरुषाच्या बरोबरीने काम करत असेल, तर तिचं बाईपण त्याने कमी होत नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या महिला पुरुषांच्या बरोबरीनेच काय तर त्यांच्यापेक्षा सरस काम करू शकतात. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची ताकद ही बाईमध्ये असते. अगदी ओझी वाहण्यापासून प्रत्येक गोष्ट महिला करू शकतात. आपल्या कुटुंबासाठी रिक्षा चालवून पोट भरताना ती बाई आपण पुरुषाची बरोबरी करतोय हा विचार करत नाही, तर आपल्या भविष्याची चिंता करत असते. महिला पायलेट या पुरुषांच्या तुलनेत फार कमी आहेत. पण म्हणून काय एखादी वैमानिक स्त्री विमान उडवताना आपले बाईपण विसरलेली नसते, तर ती गर्वाने एक महिला असताना आपल्या स्वप्नांना उंच आकाशात गवसणी घालत असते. त्यामुळे बुरसटलेले विचार असलेल्या समाजाने महिलांना त्यांचे बाईपण कशात आहे हे दाखवून देऊ नये.
आपण पाहत आलेलो आहोत आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व किती नाही म्हंटले तरी दिसून येते. पण त्यामुळे स्त्रिया कुठे कमी आहेत असे नाही. मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसरच आहेत. परंतु काही अंशी का होईना पुरुषांची मक्तेदारी आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळते. मग राजकारण असो, समाजकारण, किंवा अजून कोणतेही क्षेत्र तिथे पुरुषांची पॉवर नकळतपणे दिसून येते. मग अशावेळेस जर एखादी स्त्री उच्चपदावर गेली किंवा त्या पुरुषाशी स्पर्धा करू लागली, की तिला लगेच फटकारले जाते. तू बाई आहेस पुरुषाशी स्पर्धा नाही करू शकणार. असं तिला बोललं जातं. आपण जर कंगना रानौतचे चित्रपट पाहिले, तर लक्षात येईल तिने अनेक चित्रपटांमध्ये दमदार स्त्री व्यक्तिरेखा सादर करून चित्रपट एकटीच्या जीवावर सुपरहिट करून दाखवलेले आहेत. हिरोंची मक्तेदारी असलेल्या इंडस्ट्रीत कंगनाने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. पण म्हणून काही अभिनेत्यांना टक्कर देणाऱ्या कंगनाचे बाईपण कमी झालेले नाही. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातच महिला पुरुषांपेक्षा अधिक चांगले काम करून आपले बाईपण विसरत नाहीत, तर स्वतःचे आणि देशाचे नाव उंचावत आहेत.
0 टिप्पण्या