जगातील सर्वात मोठ्या कंपनीचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या बाबतीत जे मागच्या दोन दिवसात घडलं त्याची कल्पना करणंही अवघड आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सुंदर पिचाई यांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तर दुसऱ्या बाजूला काल त्यांनी कॉपीराइटचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
एका व्यक्तीच्या आयुष्यात दोनच दिवसात किती मोठ्या विरोधाभासी घटना घडू शकतात. बॉलिवूड मधील निर्माते दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि गुगलच्या सहा अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे की, त्यांनी बनवलेला ‘एक हसीना थी एक दीवाना था’ हा चित्रपट, त्यातील गाणी युट्युबवर त्यांना न विचारता टाकण्यात आली आहेत आणि त्याद्वारे गुगल कोट्यवधी रुपये कमावत आहे. सुनील दर्शन यांनी सांगितले की, गेल्या अकरा वर्षांपासून तो चित्रपट युट्युबवर आहे. तो चित्रपट युट्युबवरून काढण्यात यावा. यासाठी त्यांनी गुगलला अनेक पत्रं लिहिली, विनंत्या केल्या. नंतर पोलीस स्टेशनमध्ये गेले, तिथेही एफआयआर नोंदवून घेतला गेला नाही मग त्यांना न्यायालयात जावे लागले. आता न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी सुंदर पिचाई यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
हा गुन्हा कॉपीराइट कायद्याखाली येतो. जगातील जवळपास सर्व देशात कॉपीराइट कायदे आहेत. आपल्या देशात १९५७ साली कॉपीराइट कायदा करण्यात आलेला आहे. एखादी कोणतीही व्यक्ती जेव्हा नवीन संशोधन करते, नवीन वस्तू निर्माण करते, उत्पादन करते. तेव्हा या सर्वांमध्ये त्याने बौद्धिक गुंतवणूक केलेली असते, म्हणून याला बौद्धिक संपदा देखील म्हणतात. या बौद्धिक संपदेच्या उदाहरणांमध्ये संगणक सॉफ्टवेअर, कला, कविता, ग्राफिक डिझाईन्स, संगीत आणि त्याच्या रचना, कथा- कादंबऱ्या, चित्रपट, मूळ वास्तू डिझाइन, वेबसाइट सामग्री इत्यादींवर आपण कायदेशीर हक्क याद्वारे घेऊ शकतो. एकदा का व्यक्तीने नवीन चित्रपट बनवला तर पुढची ६० वर्षं तो चित्रपट कॉपीराइट कायद्याखाली येतो. त्या व्यक्तिच्या संमतीशिवाय दुसरं कोणीही त्याचा वापर करून पैसे कमावू शकत नाही. आता या उदाहरणांमध्ये हा चित्रपट आल्यानंतर लगेच तो युट्युबवर टाकण्यात आला. यामुळे सुनील दर्शन यांना या चित्रपटाच्या माध्यमातून जी कमाई होण्याची अपेक्षा होती ती झाली नाही. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आता या संपूर्ण प्रकरणात चूक ही गुगलची आहे. युट्युब हे गुगलच्या मालकीचे आहे. आपण हे समजू शकतो की, युट्युबवर दररोज लाखो व्हिडिओ अपलोड केले जातात. त्यात हे समजणं अवघड आहे की, कोणतं कॉपीराइट झालेला व्हिडिओ आहे आणि कोणता नाही. पण एखादा मोठा निर्माता, दिग्दर्शक अनेक वेळा पत्रं लिहून सांगतो आहे की, माझ्या संमतीविना हा चित्रपट टाकण्यात आला आहे, गाणी टाकण्यात आली आहेत, ती काढून टाका तर संबंधित संस्थेने त्यांचं ऐकलं पाहिजे. अनेक वेळा लक्षात आणून देऊनही जर तो चित्रपट आणि गाणी काढून टाकण्यात येत नसतील तर यामध्ये गुगलने आपला स्वार्थ साधण्यासाठी तो युट्युबवर चित्रपट ठेवला असा त्याचा अर्थ होतो. कॉपीराइट कायदा यासाठीच बनवला गेला होता की, जे लोक अनेक वर्षं मेहनत करून संशोधन करतात किंवा कला निर्माण करतात त्याचा त्यांना फायदा व्हावा. त्यांचा हक्क हिरावून घेतला जाऊ नये. हे सर्व माहीत असताना देखील गुगलने या गोष्टी कराव्यात? हे गुगलच्या प्रतिमेला अजिबात शोभणारे नाही. सुंदर पिचाई यांनी खूप चांगले काम केले म्हणून पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. त्या व्यक्तीने असे करावे?
गुगल आणि सुंदर पिचाईने आता तरी आपली चूक सुधारायला हवी. तो चित्रपट आणि त्यातील गाणी लगेच युट्यूबवरून काढून टाकण्यात यावीत आणि सुनील दर्शन यांना गुगलने आर्थिक भरपाई द्यावी तरच या प्रकरणात न्याय होऊ शकतो. इथून पुढे गुगलने असे प्रकार घडू नयेत, याची काळजी घ्यावी.
0 टिप्पण्या