आपल्या सर्व मैत्रिणींच्या नवऱ्यांनी प्रत्येक सणाला त्यांना काही न काही महागातली वस्तू दिली आहे पण आपल्या नवऱ्याने मात्र आपल्याला एकचं साडी घेतली आणि त्यानंतर तुला काही हवं का? याची विचारणाही केली नाही. त्याने स्वतःहून एखादा नेकलेस किंवा पैठणी आणायला हवी होती अशी स्वातीची आपल्या नवऱ्याकडून अपेक्षा होती. ती अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून ती सतत नवऱ्याशी भांडणं करायची. त्यामुळे दोघांमधलं नातं हे केवळ एका व्यवहारासारखं झालं होतं अगदी पोकळ! ज्यात केवळ अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा पूर्ण झाल्या म्हणजेच जोडीदारचं प्रेम आहे असा तिचा समज होता. आपण विचार केलेली प्रत्येक गोष्ट ही जोडीदाराला कळेलच असं नाही. काही गोष्टी मनासारख्या होत नसतील तर त्या गोष्टी स्वतःहून आपल्या जोडीदाराला सांगितल्या तर नक्कीच आपला अपेक्षाभंग होणार नाही.



आजकाल अनेक जोडपी कोणा न कोणा बरोबर कधी संपत्तीसाठी,आपाल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी त्या व्यक्तीकडून मिळतील म्हणून किंवा माझ्या सर्व इच्छा त्या व्यक्तीकडून पूर्ण होतील अशी वागणूक मिळेल अशा अपेक्षा करत राहतात. या अपेक्षांचा केंद्रबिंदू हा केवळ स्वतःभोवती फिरत असतो. तिथे फक्त मी आणि मीच, हेच असतं. मी! माझ्या अपेक्षा! याने माणसाची अपेक्षांची भूक वाढत जाते. पण जिथे प्रेम आहे तिथे खरंच अपेक्षा असाव्यात की नसाव्यात? काही माणसे प्रेमात असतांना अपेक्षा आपोआप निर्माण होतात असं म्हणतील. तर काही जण अपेक्षा नसाव्यात असं म्हणून मोकळे होतील. पण प्रेमात जेव्हा दोन व्यक्ती एकरूप होतात. प्रेमात अद्वैत गाठतात तेव्हा नात्यातला मीपणा संपतो. मीपणा संपला की या 'मी' बरोबर जोडलेल्या अपेक्षा ही गळून पडतात.


पण आज प्रेमाचा अद्वैत म्हणजे काय? हेच अनेकांना माहीत नसतं. त्यांना प्रेमाबरोबरच आपल्या अपेक्षा पूर्ण करणारी व्यक्ती हवी असते. आजकाल अगदी प्रेमाचा उच्चांक गाठलेल्या दोन व्यक्ती जन्मा-मरणाच्या शपथा घेतात. पण नात्यात येऊनही माझी एकही अपेक्षा त्या व्यक्तीला पूर्ण करता आली नाही म्हणून ब्रेकअप, घटस्फोट या थराला जाऊन नाती तोडतात. अपेक्षा माणसाला कमजोर बनवताचं पण त्या बरोबरीने नात्यातलं प्रेम, विश्वास, प्रेमाचा नितळपणा असं काहीही उरत नाही. अपेक्षा इतर व्यक्तीवर अवलंबून राहण्यासाठी भाग पडतात.

अनेक जोडप्यातले काही शब्द आपल्या कानावर पडत असतात “माझ्या तुझ्याकडून काय अपेक्षा आहेत हे तुला कळतच नाही, तू माझ्यासाठी हे करत नाहीस ते करत नाहीस” या तक्रारी आणि आपल्या या भल्या मोठ्या अपेक्षेमुळे आपलं नातं बिघडू लागतं. आपला जोडीदार कधीतरी नक्की आपल्याला आपली आवडती वस्तू आणेल असा विश्वास अपेक्षेमुळे डगमगतो आणि अपेक्षेपुढे त्या व्यक्तीवरचं छोट्या छोट्या गोष्टींमधून व्यक्त होणारं प्रेम हे आपल्या नजरेआड होतं. माणसाला नेहमीच मोठ्या गोष्टींची हाव असते.त्या गोष्टी आपण स्वतः प्रयत्न करून मिळवण्यापेक्षा इतरांनी आपल्यासाठी कराव्यात अशी अपेक्षा आपण करू लागतो मुळात तिथेच आपलं चुकतं.

आजची एकूणच जीवनशैली, माणसाची माणसाशी असलेली चढाओढ यामुळे काही गोष्टी बडेजाव, शोबाजी करण्यासाठी अधिक केल्या जातात. पण खरंच प्रेम हे केवळ अपेक्षापूर्तीचं एक साधन आहे का? आज अपेक्षा पूर्ण झाली म्हणून माझं तुझ्यावर प्रेम आहे! पण उद्या त्या व्यक्तीने आपल्या मनाप्रमाणे केलं नाही म्हणून ती व्यक्ती प्रेमासाठी योग्य नाही हा विचार चुकीचा आहे. प्रेम हे स्वार्थी अपेक्षा घेऊन जन्माला येत नाही. प्रेमात निरपेक्ष राहीलं की जोडीदाराच्या बाह्य गोष्टीपेक्षा अंतरात दडलेलं प्रेम अधिक लोभसवाणं वाटतं. प्रेम हे निरपेक्ष करता आलं नसतं तर प्रेमापोटी एकमेकांसाठी आपला जीव देणारी माणसे ही मूर्ख ठरली असती. त्यांना केवळ प्रेमाबरोबर जगण्याची आणि एकत्र मरण्याची भूक होती म्हणून त्यांनी प्रेम केलं. त्यांना माझ्या अपेक्षा त्या व्यक्ती कडून पूर्ण होतील याची फिकीर कधी वाटलीच नाही. पण ज्याची प्रेमाच्या नावाआड अपेक्षांची भूक मोठी होती त्यांना प्रेमाचा अर्थ कधी कळलाच नाही.
प्रेम करा अपेक्षा न ठेवता

कारण त्रास प्रेम नाही तुमच्या अपेक्षा देतात….