तमाशा म्हणजे महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्याचा प्रकार. गावोगावी, जत्रांमध्ये तमाशाचे खेळ होत असतात. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे, लॉकडाऊनमध्ये ही कला संपूर्णतः बंदच होती. त्यामुळे अनेक लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतर सर्व क्षेत्रांबाबत कोरोनाचे निर्बंध कमी करण्यात आले मात्र, तमाशा आयोजनावरचे निर्बंध कमी झालेले नव्हते. त्यामुळे या कलावंतांनी उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करत आत्मदहनाचा इशारा दिला होता. कामाची गरज स्पष्ट केली होती. त्यांना फड लवकरच सुरू करण्याची परवानगी मिळेल, असे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगण्यात आले होते. आता या आश्वासनानुसार राज्यभरात येत्या १ फेब्रुवारीपासून पुन्हा तमाशाचे फड रंगणार आहेत. त्यामुळे कलावंतांना उदरनिर्वाहाचे आपले साधन परत मिळणार आहे. राज्यातील सुमारे दहा हजार कलावंतांना या निर्णयाने आधार मिळालेला आहे.


लोककलेचे महत्त्व
लोककला ही प्राचीन काळापासून चालत आलेली कला आहे. सौंदर्य आणि कलात्मक पद्धतीने लोककला सादर केली जात असते. तमाशा हादेखील त्यातीलच एक प्रकार. आत्ताच्या आधुनिक काळामध्ये तमाशा किंवा यासारख्या इतर लोककलाही अनेक आव्हानांचा सामना करत आहेत. ठराविक प्रेक्षकांचाच या लोककलांकडे कल दिसतो. त्यामुळे ही कला सादर करणाऱ्यांसमोरही उदरनिर्वाहाचा प्रश्न आज आहे. प्रत्येक कलेचा वारसा हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. त्यामुळे या कलांनाही चालना दिली पाहिजे तरच लोककलेचे महत्त्व टिकवून ठेवता येईल. आपल्या राज्याची संस्कृती खेळीमेळीच्या माध्यमातून जनतेसमोर येण्यासाठी तर कधी प्रबोधन करण्यासाठी तमाशाचे फड महत्त्वाचे ठरत होते.
अस्तित्वाची लढाई
गेल्या दोन दशकांमध्ये तमाशा या लोकनाट्यकलेपुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. कारण पूर्वी मनोरंजनाचे एकमेव साधन म्हणून त्याकडे पाहिले जात होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. मनोरंजनाची अनेक साधने सध्या समोर आहेत. मनोरंजनासाठी मोबाईल, स्मार्ट टीव्हीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. वाटेल ते, वाटेल तेव्हा बघण्याची सोय या उपकरणांमुळे झाली आहे. त्यामुळे तमाशा यांसारख्या लोककलांची सध्या अस्तित्वाशीच झुंज सुरू आहे. येत्या काळात या लोककलेला लोकाश्रय तसेच सरकारचा आश्रय मिळाला नाही तर ही कला लोप पावेल, अशी भीतीही लोककलावंतांकडून व्यक्त केली जात आहे.
काळानुसार बदल गरजेचा
तमाशाच्या फडांना परवानगी मिळाली असली तरी सध्याच्या आधुनिक काळात तग धरण्यासाठी लोककलावंतांना बदल करण्याशिवाय पर्याय नाही. पारंपरिक बाबी टिकवणे हे संस्कृतीच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचेच असते पण पारंपरिकतेला आजच्या काळाची जोड दिली तरच आजच्या पिढीला एखादी कला आपलीशी वाटू शकते. प्रेक्षकांशी ती कला जोडली जावी, यादृष्टीने प्रयत्न होणेही गरजेचे आहे. प्रेक्षकांनी कलेकडे पाठ फिरवली इतके बोलण्यापर्यंतच मर्यादित न राहता प्रेक्षकांना आताच्या काळानुसार काय अपेक्षित आहे, याचा विचारही कलावंतांनी केला पाहिजे. ते त्यांच्यासाठी तर भल्याचे ठरेलच शिवाय लोककला टिकवून ठेवण्यासाठीही मदतीचे होईल.
परवानगी मिळाल्याने दिलासा
गेल्या दोन वर्षांपासून आपण सगळेच जण कोरोनाचा सामना करत आहोत. प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्षपणे आपल्याला या संसर्गाने धोका पोहोचवला आहे. असे एकही क्षेत्र नाही ज्याला कोरोनामुळे धक्का पोहोचला नसेल. अद्यापही अनेक क्षेत्रांना त्यातून सावरता आलेले नाही. तमाशा, लोककला हेदेखील त्यातलेच एक किंवा कोरोनामुळे जास्त भरडले गेलेले क्षेत्र आहे, असे आपल्याला म्हणावे लागेल. कारण राज्यभरात इतर सर्व गोष्टी, सर्व क्षेत्र सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाषणांचे आयोजन करण्यात आले, लोकांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. असे असताना तमाशावरच बंदी का, असा प्रश्न या कलावंतांनी विचारला होता. एकूणच सातत्याने तमाशांच्या फडांनाच परवानगी नाकारली गेली होती. या अन्यायाविरुद्ध कलावंतांनी आवाज उठवला आणि आता त्याचे फळ मिळाले आहे. अनेक समाजमाध्यमांमधून त्यांनी आपली व्यथा मांडली होती. आता परवानगी मिळाल्याने तमाशा रंगणार, याचा आनंद त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. पण असे असले तरी अद्याप तमाशापुढची आव्हाने संपलेली नाही. तमाशा बघताना लोकांनी कोरोना संसर्गांसंबंधित नियमांची काळजी घेणेही गरजेचे आहे. तमाशात बेधुंद होऊन नाचण्याच्या हौसेतून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची काळजी आयोजकांनी घेतली पाहिजे. नाहीतर पुन्हा राज्य सरकार निर्बंध लावेल आणि पुन्हा कलावंतांपुढे जगायचे कसे, हा प्रश्न उभा राहिल.