लाल रंगाचा बदाम पाहिला की आपल्या डोळ्यासमोर काय येते? तर नक्कीच प्रेम... लाल बदाम हा प्रेमाचे प्रतिक म्हणून आपण अनेकदा वापरतो. आपल्या वॉट्सऍपमध्ये सुद्धा लाल रंगाचा मोठा बदाम इमोजी म्हणून आहे. आणि आपण वॉट्सऍपवर एकमेकांना कितीतरी वेळा हा बदाम आपले त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी पाठवत असतो. पण मग या बदामाला आपण हार्ट म्हणजेच हृदय का म्हणतो. आपल्या हृदयासोबत या बदामाची तुलना आपण का करतो. ते बदामाचे चिन्ह आणि मानवी हृदय यामध्ये तर काहीच साम्य नाही. तरी देखील त्या बदामाला आपण हार्ट म्हणतो. याच हार्ट विषयी आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्या हृदयाचा आणि बदामाचा संबंध आहे तरी काय चला पाहुयात...
लहानपणापासून आपण बघतो कोणासमोर प्रेम व्यक्त करायचे असेल तर एक मोठा बदाम काढून त्यामध्ये बाण दाखवतात आणि त्या बदामात प्रियकर आणि प्रेयसीची नावे लिहिलेली असतात. कोणत्याही प्रेक्षणीय स्थळी किंवा गड किल्ल्यांवर जरी आपण गेलो तरी मोठाल्या झाडांवर आणि दगडांवर सुद्धा आपल्याला प्रेमवीरांनी चितारलेले बदामाचे आकार दिसतात. त्यामुळे लहानपणापासूनच आपण जे पाहिलं आहे त्याला सत्य समजू लागतो आणि बदामाला प्रेमाचं प्रतिक आपण मानतो. पण हे लाल रंगाचे हार्ट आपल्या हृदयाशी जोडले गेलेले आहे ते अगदी सहाव्या शतकापासून. काही ग्रीक लोकांनी सर्वात आधी या बदामाचा शोध लावला आणि त्याचा संबंध हृदयाशी जोडला असा इतिहास आहे. तसेच तेराव्या शतकात एका प्रसिद्ध रोमन कवीने आपले हृदय आपल्या प्रेयसीला देत असल्याचे त्याच्या कवितेत म्हटले होते. तेव्हापासून हृदयाला प्रेमाशी जोडले गेलेले आहे.
तसेच मध्ययुगात एका चित्रकाराने एका जोडप्याचे सुंदर चित्र काढले होते. त्यामध्ये मुलगा गुडघ्यावर बसून आपल्या समोर उभ्या असलेल्या प्रेयसीला हृदय देत असल्याचे दाखवले होते. ते हृदय मानवी हृदय असून हळूहळू त्याचा आकार चित्रांमध्ये बदलत जाऊन कालांतराने त्याला बदामाचा आकार मिळाला. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे राजहंसाची एक जोडी जेव्हा प्रणय करते तेव्हा ते एकमेकांना चुंबन घेत असताना त्यांच्या मानेचा आकार हा बदामासारखा होतो. त्यांच्या प्रेमात तयार झालेली ही आकृती पुढे बदाम म्हणून प्रेमाच्या प्रतिकासाठी वापरली जाऊ लागली. त्यामुळे आपण अनेकदा पाहतो की राजहंसाचे चित्र प्रेमाविषयी काही बोलायचे असेल, सांगायचे असेल तर हमखास वापरतात.
प्रेमाचा आणि हृदयाचा संबंध जर आपण पाहिला तर प्रेमाची उत्पत्तीच हृदयातून होते. आपल्या हृदयामध्ये अनेक भावना निर्माण होत असतात. हृदयात निर्माण झालेली प्रत्येक भावना ही हळवी असते. त्यामुळे आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटू लागले, तिच्याविषयी प्रेम निर्माण झाले तर या भावना आपल्या मेंदूत नाही तर हृदयात निर्माण होतात. प्रेम ही तर अत्यंत नाजूक आणि हळवी भावना आहे. त्यामुळे ती हृदयात उत्पन्न झाल्याने प्रेमाचा थेट संबंध हृदयाशी येतो. म्हणून आपण प्रेमातील प्रत्येक निर्णय हे मेंदूने नाही तर मनाने, हृदयाने घेतो. अनेक प्रेमवीरांना प्रेमात पडताना किंवा प्रेमातील निर्णय घेताना, "दिमाग की नही दिल की सून…” असा सल्ला आपण देत असतो.
तुम्हाला हे माहित आहे का की आपण आपल्या साखरपुढ्याची अंगठी डाव्या हातातील चौथ्या म्हणजेच करंगळी शेजारच्या बोटात का घालतो. कारण आपल्या डाव्या हातातील करंगळी शेजारच्या बोटाची नस ही थेट हृदयाशी जोडलेली असते. मग प्रेमाचं परिवर्तन जेव्हा एका नवीन नात्यात होत असतं, त्या प्रेमाला पूर्णत्व देण्यासाठी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार असतो तेव्हा देखील आपण आपल्या हृदयाशी सर्वात आधी हे नातं जोडून घेतो. हृदयाशी हे नातं इतकं दृढ असतं की प्रेमळ क्षणांमध्ये हे हृदयच आपल्याला जोरजोरात धडकून आपल्या भावनांची आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची जाणीव करून देत असतं. म्हणूनच कवींना सुद्धा “हृदयी वसंत फुलताना,” “हृदयी प्रीत जागते… जाणता अजाणता” अशी गाणी स्फुरतात. प्रेमातील, नाते संबंधातील हृद्य आठवणी सुद्धा अशाच आपल्या सोबत आयुष्यभर असतात. त्याच आपल्या हृदय धडाडत ठेवण्याच्या, जगण्याच्या प्रेरणा असतात. म्हणूनच बदामाच्या आकाराच्या वस्तू ह्या हृदयाचं प्रतिक म्हणून हव्या असतात. आता तुम्हाला यामागचा इतिहास कळलाच आहे तर तुम्ही तो आल्या मित्र मैत्रिणींना सुद्धा सांगा. न जाणो त्यांच्याही प्रेमाला ह्या लहानशा माहितीने बहर येईल.
0 टिप्पण्या