गणपती, गणपराय, वक्रतुंड, एकदंत, विनायक अशा अनेक नावांनी आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची आराधना करतो. प्रत्येक मंगल कार्यात सर्वात पहिली पूजा असते गणरायाची…. गणपतीला विघ्नहर्ता मानलं जातं म्हणून सर्वात प्रथम पुजेचा मान त्याला दिला जातो. आपण गणपती असे म्हणतो त्यावेळी आठवते ते गणेश चतुर्थी, संकष्टी किंवा विनायकी चतुर्थी. या प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे. आज आपण विनायकी चतुर्थी याची माहिती घेणार आहोत. दर महिन्यात दोन चतुर्थी येतात. शुक्ल पक्षाच्या अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. सर्व देवतांच्या आधी गणपतीची पूजा केली जाते यामुळे विनायकी चतुर्थीचं देखील वेगळं महत्व आहे.


शिवपुराणात विनायकी चतुर्थी संदर्भात कथा सांगितली जाते. ही कथा आपल्याला माहित असेलच. पार्वतीने आपल्या मळापासून एक बाळ तयार केले आणि त्यात प्राण फुंकला. त्याचे नाव गणपती ठेवले आणि त्याला द्वारपाल नेमून पार्वती स्नानास गेली. थोड्या वेळात शंभो शंकर तिथे आले आणि त्यांना गणपतीने अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद झाला पण वादाचे रुपांतर युद्धात झाले. क्रोधीत शंभोमहादेवाने त्रिशुलाने त्या मुलाचे मुंडके उडवले. पार्वतीला हे समजले आणि त्यांनी सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद आणि देवगणांनी पार्वतीला शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली. शंभोशंकरांनी त्यास होकार दिला परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले. प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला आणि गणेश नावाने प्रसिद्ध झाला.


विनायकी चतुर्थी व्रत कथा सांगितली जाते त्यानुसार नर्मदा नदी किनारी शंभोशंकर आणि पार्वती चौपट खेळत असतात. या दोघांमध्ये कोण विजेता आहे हे ठरविण्यासाठी शंभोमहादेव एक पुतळा तयार करतात आणि त्याला जिवंत करता. त्या पुतळ्याला ते आदेश देतात आमच्यापैकी कोण विजेता हे तू ठरवं. त्यानंतर तीनवेळा चौपट खेळला जातो आणि पार्वती त्यात जिंकते. जेव्हा त्या मुलाला विचारले जाते त्यावेळी शंभोमहादेव विजेता आहेत असे तो घोषीत करतो. पार्वतीमाता ते ऐकून क्रोधीत होते आणि त्या बालकाला शाप देते तू अधु होवून चिखलात राहशील. तो मुलगा घाबरतो आणि पार्वती मातेची माफी मागतो. तेव्हा पार्वती माता सांगतात, ‘येथे जेव्हा नागकन्या श्री गणपती पुजेसाठी येतील, त्या जसे सांगतील त्याप्रमाणे गणपती व्रत कर म्हणजे तू शापमुक्त होशील.’


तो बालक आपल्या शापासोबत संघर्ष करत जगत असतो. एक वर्षानंतर गणपतीची पुजा करण्यासाठी नागकन्या तिथे येतात. तो बालक त्यांना गणपतीच्या व्रतासंदर्भात सर्व विधी विचारुन घेतो. २१ दिवस तो बालक मनापासून गणपतीची आराधना करतो. गणपती त्याच्या उपासनेने प्रसन्न होतात आणि त्याला दर्शन देतात. गणराया त्याला वर मागायला सांगतात. तो बालक म्हणतो, ‘माझा पाय स्वस्थ होवू दे आणि कैलास पर्वतावर जावून शंभोमहादेव आणि माता पार्वतीचे दर्शन घडू दे.’ गजराज त्या बालकाची इच्छा पूर्ण करतात. कैलास पर्वतावार जावून तो बालक शंभोशंकराचे आणि पार्वती मातेचे दर्शन घेतो.


वैदिक काळात असे सांगतात की, शंभोमहादेवाने २१ दिवस गणपती व्रत केले होते. त्यानंतर पार्वती मातेचा राग शांत झाला होता. शंभोमहादेव यांनी या व्रताचा महिमा पार्वतीला सांगितला. काही दिवसांनी पार्वती मातेला कार्तिकेयाची आठवण आली आणि त्याला भेटावे असे वाटले. तेव्हा माता पार्वतीने २१ गणपतीचे व्रत केले आणि काय चमत्कार कार्तिकेय स्वतःहून त्यांना भेटायला आला. तेव्हापासून सगळेजण विनायकी चतुर्थी व्रत करतात असे सांगितले जाते. विनायक चतुर्थीची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा.