दा. कृ. सोमण यावर्षी शुक्रवार , दि. ४ फेब्रुवारी रोजी मध्यान्हकाळी आणि प्रदोषकाळी माघ शुक्ल चतुर्थी असल्याने याच दिवशी श्रीगणेश जयंती, विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी आणि वरद चतुर्थी आहे. अजूनही जगावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जसे आपण शिस्तीने व सर्व नियम पाळून उत्सव साजरे करीत आलो त्याप्रमाणेच यावर्षींची गणेश जयंतीही साजरी करावयाची आहे. गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ‘ पुष्टिपती विनायक जयंती ‘ म्हणून आपण साजरा करीत असतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘ श्रीगणेश चतुर्थी ‘ म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करीत असतो. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला ‘ गणेश जयंती ‘ म्हणून आपण साजरा करीत असतो.
माघ महिन्यातील पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते. तसेच भाद्रपद महिन्यातील गणेशचतुर्थीला जशी घरोघरी मातीची गणेशमूर्तीची पूजा केली जाते तशी माघातील गणेशजयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही. तशी परंपरा किंवा प्रथाही नाही. गणेशमूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करावयाचे तेही कोणत्याही मान्यवर धर्मशास्त्रग्रंथात सांगितलेले नाही. काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. काही कुटुंबात गणेशजयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते. गणेश जयंतीच्या दिवशी नक्तव्रत आचरून ढुंढिराजाचे पूजन करावे
आणि तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावेत असे सांगण्यात आले आहे. दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर भोजन करण्याचीही प्रथा आहे. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला ‘ तिलकुंद चतुर्थी ‘ असेही म्हणतात. या तिथीला स्नान, दान,जप व होम कर्म केल्यास गणेशकृपा राहते अशीही उपासकांची श्रद्धा असते
0 टिप्पण्या