प्रेमात पडल्यानंतर प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना आपल्या प्रेमाची आठवण म्हणून भेटवस्तू देत असतात. मुलींना भेटवस्तू घ्यायला किती आवडतात हे काही सांगायला नको. त्यामुळे आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी अनेक मुले तिला आवडतील अशा गोष्टी गिफ्ट म्हणून देतात. पण, खरी मजा तर इथेच असते. प्रेयसीला आवडणारी गोष्ट तुम्हाला सहजासहजी सापडणे फार कठीण असते. अन एखादी वस्तू तुम्हाला छान वाटली तर ती तुमच्या प्रेयसीला आवडेल का हे तुम्ही सांगू शकत नाही. मग दिलेले गिफ्ट तिला आवडले नाही तर?, हा प्रश्न सुद्धा प्रेमवीरांच्या मनात येतो आणि ते बुचकळ्यात पडतात. गिफ्ट काय घ्यायचे हा खूप मोठा प्रश्न असतो त्यामुळे गिफ्ट देणे, घेणे आणि ते आवडणे हे प्रेमात सोपे नसते.

प्रेमात असताना गिफ्ट द्यायला आणि घ्यायलाही काही कारण लागत नाही. मुली अगदी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेऊन त्या साजऱ्या करत असतात. आपण पहिल्यांदा या तारखेला भेटलो होतो मग ती तारीख खास होते. तो दिवस आठवणीत राहण्यासाठी प्रियकराला खास भेटवस्तू त्यांना द्यायची असते. मग आपण काय देऊ शकतो याचा विचार सुरु होतो. दहा दुकाने फिरूनसुद्धा एक वस्तू त्यांना आवडत नाही. ‘घड्याळ घ्यायचे झाले तरी त्याच्याकडे आधीच दोन तीन घड्याळ आहेत. पण आपण दुसऱ्या ब्रँडचे दिले तर तो घालेल. मग पुन्हा विचार येतो नको त्याला नाहीच आवडले तर काय करू, जाऊदेत, दुसरं काहीतरी बघते’, असे म्हणून दहा गोष्टी बघितल्या तरी काय घ्यायचे हे कळत नाही.

आपल्या जोडीदाराने आपल्याला जर एखादे महागडे गिफ्ट दिले तर ते घ्यायला आपल्याला संकोच वाटतो. कशाला इतके पैसे खर्च करून गिफ्ट घेतले असे आपण पटकन त्याला बोलूही शकत नाही. मग त्यावेळी आपल्याला कसं व्यक्त व्हायचं, गिफ्ट घ्यायचं की नाही हा प्रश्न पडतो. जोडीदाराला दुखवायचे कशाला म्हणून आपण त्यावेळी गिफ्ट घेतो. परंतु त्याने जर आपल्याला महागडे गिफ्ट दिले तर आपण सुद्धा त्याला पुढच्या वेळी असेच महागडे गिफ्ट द्यायला पाहिजे ही जबाबदारीच आपल्यावर येते. भेटवस्तू या आपण प्रेमाने दिलेल्या असतात त्यामुळे त्यांची किंमत करायची नसते हे खरे आहे. परंतु समोरच्याकडून आयफोन घेऊन त्याला साधा हेडसेट गिफ्ट करायला अनेकांना चांगले वाटत नाही.



उमाशंकरनने मला प्रपोज केले आणि आम्ही रिलेशनमध्ये आलो. पुढच्याच आठवड्यात व्हॅलेंटाईन डे होता. त्याला गिफ्ट काय घ्यायचे हा विचार मी करत होते. माझ्या मैत्रिणींना सुद्धा, ‘काय गिफ्ट घेऊ गं’, म्हणून त्यांचे मत विचारले. त्यांनी एक दोन गोष्टी मला सुचवल्या पण त्या मला पटल्या नाहीत. गिफ्ट असे द्यायचे की त्याच्या कायम सोबत राहू शकेल म्हणून मी त्यावेळी बऱ्याच दुकानांमध्ये फिरले. एका दुकानात मला A  नाव लिहिलेले किचैन दिसले.  मला आवडलले. मी त्याच्या नावाचे किचैन घेतले. खरतर त्यायचे टोपण नाव आणि माझे नाव हे  A  या अक्षरराने सुरु होते...  आम्ही व्हॅलेंटाईन डेला भेटलो. मी खूप उत्सुक होते. त्याला भेटून कधी गिफ्ट देते असे मला झाले होते.  तेवढ्यात मला त्याच्या  हातात तेच सेम किचेन दिसले आणि क्षणात माझ्या आनंदाचा फुगा फुटला. माझा पडलेला चेहरा पाहून त्याने विचारले, ‘काय झाले?’ मी हातात किचैन घेऊन त्याला दाखवले आणि तो सुद्धा हसू लागला. ‘ठीक आहे गं!’ म्हणत त्याने प्रेमाने ते किचैन घेतले पण त्यादिवशी माझा झालेला पोपट मी अजून विसरू शकले नाही. त्यामुळे आजही त्याला गिफ्ट घेताना काय घेऊ हा प्रश्न मला पडतो.

प्रेमात भेटवस्तू देताना अशा द्या की, त्या तुमचा जोडीदार कायम सांभाळू शकतो. भेटवस्तू देताना त्यामध्ये जोडीदाराच्या भावना गुंतलेल्या असतात. ती वस्तू केवळ वस्तू राहत नाही तर जोडीदारासाठी तुम्ही दिलेलं गिफ्ट प्रेमाचं प्रतीक असत. त्यामुळे प्रेमात गिफ्ट देताना खूप काळजी घ्यावी लागते. असे असले तरी प्रेमातील भेटवस्तू या आपल्या आयुष्यभराच्या आठवणी असतात.