स्वतःवर प्रेम करणं कसं महत्त्वाचं आहे, यावर आम्ही मित्रमैत्रिणी बोलत बसलो होतो. आमचं बोलणं ऐकून आमच्यातला एकजण वैतागलाच. “अरे, काय सारखं सेल्फ लव्ह, स्वतःवर प्रेम करा म्हणताय, नेमकं काय करायचंय त्यावर तर तुम्ही बोलतच नाहीये.” त्याचं बोलणं ऐकून आम्हाला हसायलाच आलं. “अरे, स्वतःवर प्रेम करणं माहित नाहीये का तुला? तुझं नाहीये का तुझ्यावर प्रेम वगैरे वगैरे आम्ही त्याच्याशी बोलायला लागलो. आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, तेव्हा त्या व्यक्तीला कसं जपतो, त्याला कशातून आनंद मिळेल याची काळजी घेतो, अगदी तसंच स्वतःबाबतही करायचं. इतकं सोपं आहे बघ”, असं उत्तर त्याला आम्ही दिलं.
खरं तर, माणूस सगळ्यात जास्त वेळ स्वतःसोबत घालवत असतो, पण तरीही स्वतःवरच प्रेम करायला विसरतो. स्वतःपेक्षा इतरांवर जास्त लक्ष देतो. इतरांवर प्रेम करू नये असं नाही पण स्वतःवरही करावं, इतकंच. आपल्याला जी व्यक्ती आवडते त्या व्यक्तीला काय हवं, काय नको, तिला काय आवडतं, आपण असं काय करावं ज्याने ती खूश होईल, याचा आपण सगळेच जण विचार करत असतो. ते करतानाच आपल्याला काय आवडतं, आपला आनंद कशात आहे, आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी, कसं खूश ठेवायचं स्वतःला याचाही विचार आपण केला पाहिजे. यातून आपलं आपल्यावर किती प्रेम आहे, हे दिसून येतं.
बऱ्याचदा आपली इतरांविषयी अतिशय समर्पित भावना असते. चांगल्या समाजासाठी, नातेसंबंधांसाठी ती महत्त्वाचीच आहे. पण हे समर्पण करताना कधी आपण कमी पडलो तर त्याचा दोष घेत जगायचं नाही, हेही आपल्याला कळलं पाहिजे. लग्न, मुलं झाली की बऱ्याच व्यक्तींचं आयुष्य कुटूंबाला काय हवंय ते पाहण्यातच संपतं. त्यांचे टिफिन, त्यांना वेळेत जेवण देणं, भाज्या आणणं, त्यांच्या गरजांसाठी पैसा कमावणं, त्यांना सगळ्या सोयी-सुविधा मिळत आहेत की नाही पाहणं, आवश्यक सर्वच लहानमोठ्या गोष्टींची काळजी करण्यात अनेकदा व्यक्ती गुंग होतात. एखाद्यावेळी हे सगळं करताना कुठे खंड पडला, आजारपणामुळे हे सगळं करता आलं नाही तर आपल्या कुटूंबाची कशी आपल्यामुळे हेळसांड झाली, असा दोष ते स्वतःला देत बसतात.
0 टिप्पण्या