तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आपसूकच हृदयात रोमँटिक गाणी वाजू लागतात. इथूनच प्रेमाला अंकुर फुटतात आणि रोमान्सची सुरुवात होते. विशीत असताना या गोष्टी तुमच्यासोबत होणे फार स्वाभाविक आहे. मात्र या वयात प्रेमात पडून त्या नात्याची जबाबदारी मुले घेऊ शकतात का हा प्रश्न आहेच. विशीत असताना म्हणजेच कमी वयात प्रेमात का पडू नये याचं उत्तर तुम्हांला या लेखात नक्कीच मिळेल.
१. तुम्ही स्वतःला शोधत असता
विशीत येईपर्यंत मुलांसमोर अनेक आव्हाने उभी असतात. अशातच मुले स्वतःला देखील शोधण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला काय हवे आहे याचा विचार याच वयात सुरु असतो. व्यक्ती म्हणून आपण कोण आहोत हे सुद्धा मुलांना या वयात समजू लागते. दुनियादारीची जाण त्यांना होऊ लागते. आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर येऊन मुले या वयात उभी असतात. अशा काळात जर तुम्ही प्रेमात पडलात तर तुमच्या आयुष्याची सगळी गणिते बिघडू लागतील हे समजून जा.
२. प्रेमाबद्दल प्रगल्भता नसते
मुले तरुणवयात आली की त्यांना प्रेमाबद्दल फार उत्सुकता असते. एखाद्या मुलाने किंवा मुलीने आपल्याकडे पाहिले तरी त्यांच्या अंगावर शहरे येतात. समोरच्या व्यक्तीच्या दोन गोड शब्दांना सुद्धा मग मुले या वयात प्रेम समजू लागतात. प्रेमाची व्याख्याच मुलांना समजलेली नसते. चित्रपटांमध्ये पाहून आपण सुद्धा असेच काहीतरी थ्रिलिंग, रोमँटिक करावे असे त्यांना वाटते आणि अगदी सोशल साईसवरून देखील मुले आपले प्रेम शोधतात. त्यामुळे प्रेमातून नक्की आपल्याला काय हवे आहे आणि आपण आपले नाते कुठपर्यंत घेऊन जाणार याची त्यांना कल्पनाच नसते.
३. करिअर महत्वाचे असते:
विशीत असताना मुलांसाठी त्यांचे शिक्षण आणि करिअर महत्वाचे असते. प्रेम करायला तर पूर्ण आयुष्य पडलेले असते. तुमचं शिक्षण आणि नोकरी उत्तम असेल तर कोणतीही मुलगी अथवा मुलगा तुमच्या प्रेमात पडतील. तुम्ही जर विशीत प्रेमात पडून मजनू बनून फिरू लागलात, करिअर केले नाही तर तुमच्या विशीतल्या प्रेमाचे भविष्य "देवदास" पेक्षा वेगळे असू शकणार नाही. त्यामुळे या वयात प्रेमापेक्षा करिअरवर लक्ष केंद्रित करा.
४. शारीरिक आकर्षण असते:
तारुण्यात मुलांच्या लैंगिक भावना जास्त प्रमाणात जागृत होतात. त्यांना आपल्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी देखील प्रेमाची आवश्यकता असते. शारीरिक जवळीकतेविषयी या वयात मुलांना कमालीचे आकर्षण असते. इथे मात्र काहीज णांकडून चूक होते. मुले आपल्या शारीरिक गरजेला प्रेमाचे नाव देतात आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनेशी नकळतपणे खेळतात. त्यामुळे प्रेम आणि वासना या दोन वेगळ्या गोष्टी असतात हे समजल्याशिवाय प्रेमाच्या वाटेवर जाऊ नका.
५. या वयात लग्नाचा विचार करू शकत नाही:
प्रेमात पडल्यावर अनेकांना लगेच लग्न करायचे असते. प्रेमाचा शेवट हा लग्नच असतो असे या वयातील तरुणांना वाटू लागते. मात्र नोकरीचा पत्ता नसतो. कमाई नसते मग अशात लग्नाची जबाबदारी इतक्या कमी वयात तुम्ही घेऊ शकत नाही. त्यामुळे विशीत असताना प्रेमापासून थोडे लांब राहिलेले कधीही फायद्याचे ठरते.
तुम्ही सुद्धा विशीत असाल आणि प्रेमाचा विचार करत असाल तर या गोष्टींचा विचार करा. तसेच प्रेमाला कशाचे बंधन नसते म्हणतात ते सुद्धा खरे आहे. काही मुलांच्या प्रेमावर कोणत्याच गोष्टीचा परिणाम होत नाही अशी मुले वरील गोष्टींना अपवाद असतात. त्यामुळे विशीत असताना प्रेमात पडत असाल तर काळजीपूर्वक निर्णय घ्या.

0 टिप्पण्या