खऱ्या प्रेमाबद्दल मुलांना कसे समजवावे? 

प्रेमात पडणे आजकाल खूप सोपे झाले आहे. आज दोघे भेटले, उद्या प्रपोज केले आणि परवापासून नात्यात असल्याचे सांगून मोकळे झाले. असे जर होत असेल तर मुलांना प्रेम म्हणजे नक्की काय हे माहित आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. प्रेमासारखी भावना अनुभवण्यासाठी एकमेकांना समजून घेणे, वेळ देणे महत्वाचे असते. मात्र तसे न होता खूप मुले-मुली प्रेमाच्या बाबतीत उतावीळ भूमिका घेताना दिसतात. आजच्या लेखात आपण खऱ्या प्रेम मुलांना कसे समजवायचे हे वाचूयात.
मुलांना सगळ्यात आधी तर आदर्श नातं कसे असावं याबद्दल पालकांनी सांगायला हवं. प्रेमात पडल्यावर अमुक व्यक्तीवर आपला हक्क आहे असे समजून मुले-मुली आपल्या जोडीदारावर अधिकार गाजवू लागतात. असे करताना समोरच्या व्यक्तीच्या भावना आपण पायदळी तुडवतो त्यांना किंमत देत नाही हे मुलांना समजत नाही. प्रेमात एकमेकांच्या भावनांचा आदर करावा लागतो. जोडीदार म्हणून एकमेकांना समजून घेणे आवश्यक असते हे मुलांना सांगणे गरजेचे आहे. नात्यात जर तुम्ही हक्क आणि अधिकार गाजवू लागलात तर ते नातं फार काळ टिकणार नाही. तुमचा जोडीदार तुमच्या या स्वभावाला कंटाळून दूर होईल. त्यामुळे एका आदर्श नात्यात रहायचे असेल तर दोघांनी एकमेकांच्या विचारांचा, स्वातंत्र्याचा सन्मान करायला हवा.
प्रेमाच्या नावाखाली उगाच आपल्या जोडीदाराचा मानसिक, शारीरिक छळ करणे चुकीचे आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असं म्हणून प्रेयसीच्या चुकीवर तिला तुम्ही मारणे तर हे योग्य नाही. असे खूप जोडपे असतात जे नात्यात असतांना मारहाण करतात. तसेच तुझं माझ्यावर प्रेम नाही असं म्हणून जोडीदाराचा मानसिक छळ करतात. मला वेळ देत नाही असं म्हणून सुद्धा भांडण करू लागतात. काही वेळेस जोडीदारावर संशय घेऊन त्यांच्यावर बंधने घालतात. इकडे जायचे नाही, अमुक व्यक्तीला भेटायचे नाही असं म्हणून त्रास देतात. हा त्रास अनेकजण त्याचे किंवा तिचे माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून ती/तो माझ्याशी असं वागतोय असे समजून त्या नात्यात राहतात. असे वागणे प्रेमात असण्याचे लक्षण नाही हे मुलांना समजून सांगायला हवे.
प्रेम, आकर्षण आणि वासना या तिन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मुले इथेच फसतात. काही वेळेस आकर्षण आणि वासनेला प्रेम समजतात. त्यामुळे मुलांना यातील फरक तुम्ही समजावून सांगा. प्रेम हे निरपेक्ष अगदी निखळ असते. ते समोरच्या व्यक्तीच्या गुण-दोषांसहीत स्वीकारले जाते. आकर्षण हे फक्त बाह्य सौंदर्यावर अवलंबून असते. जो पर्यंत व्यक्ती सुंदर दिसते तोपर्यंत असे प्रेम टिकून राहते. अशा नात्याला अनेक जण प्रेम समजू लागतात. प्रेमाच्या नावाखाली शारीरिक जवळीकता साधत असाल तर अशा नात्यात तुम्ही फक्त तुमच्या स्वार्थासाठी असता. हा फरक पालकांनी मुलांना सांगून त्यांना खरे प्रेम काय असते याची जाणीव करून द्यावी.
मुलांना या गोष्टी सांगताना तुम्ही त्यांच्याशी प्रेमळ शब्दांमध्ये बोलायला हवे. या गोष्टी आपल्याकडे मोकळेपणाने बोलायला अजून पालक तयार नसतात. त्यामुळे दोघांनाही बोलताना अवघडल्यासारखे वाटू नये यासाठी पालकांनी मित्र बनून या विषयावर बोलावे. तसेच कधीही मुलांना जर पालकांची गरज लागली तर आम्ही तुम्हाला सपोर्ट देऊ असे त्यांना सांगावे. यामुळे मुले प्रेमाच्या नात्यात कधी चुकीच्या ट्रॅकवर जाऊ लागली तर त्यांना पालकांचा आधार मिळतो. मुलांनी तरुणवयात प्रेमाच्या नात्यात गल्लत करून फसू नये यासाठी पालकांनी मुलांना खरे प्रेम काय असते हे नक्कीच सांगावे.