"कामा पुरता मामा" ही म्हण तर सगळ्यांनीच ऐकली असेल. अनेकांनी त्याचा अनुभव सुद्धा घेतला असेल. कारण आपल्या आजूबाजूला अशी खूप लोकं असतात जी केवळ त्यांच्या कामासाठी आपल्या जवळ येतात. त्यांच्या सोयीनीसार ते आपल्याशी संबंध ठेवतात. अशा लोकांना आपण सहसा काही बोलत नाही. उगाच कशाला कोणाचं मन दुखवायचं असं म्हणून त्यांना दुखावत सुद्धा नाही. मात्र जेव्हा ही लोकं तुम्हाला जास्त गृहीत धरू लागतात तेव्हा उत्तर देण्याची गरज असते. आपल्या गरजेला न पडता स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जवळ येणाऱ्या लोकांना महिलांनी कसे उत्तर द्यायचे ते आपण आज वाचूयात.
आमची मैत्रीण सारिका आली की आम्ही सगळ्याजणी समजून जायचो आज हिचं काहीतरी काम आहे. कारण सारिका फक्त नावापुरती मैत्रीण होती. कधीच कोणाला मदत करायची नाही. गप्पा मारायला थांबायची नाही. जेव्हा ती कॉलेजला सुट्टी घेई त्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र न विसरता आमच्याकडे यायची. गोड बोलायची आणि कालच्या नोट्स आमच्याकडून घेऊन जायची. तिला कधी म्हटलं, ‘आज मला तुझ्या गाडीवरून सोडशील का?’ तर सरळ काहीतरी कारण देऊन निघून जायची. एक दिवस आम्ही तिला अद्दल घडवायचे ठरवले. प्रोजेक्ट बनवायला ग्रुप करायचा होता. सगळ्या मुलींनी तिघी-तिघींचा ग्रुप केला. हिला कोणीच ग्रुपमध्ये घेतले नाही. तिने असं का करताय विचारल्यावर तिला, "तू फक्त कामापुरती आहेस. आज सुद्धा तुला आमची गरज आहे म्हणून आमच्याशी बोलतीयेस. तुला ग्रुपमध्ये घेतलं तर तू काहीच काम करणार नाहीस सगळं आमच्यावर ढकलशील." असं बोलल्यावर तिला तिची चूक कळली.
कामापुरत्या जवळ येणाऱ्या खूप व्यक्ती असतात. अशा व्यक्तींना आपण स्वार्थी म्हणतो. स्वतःचा स्वार्थ साधून झाला की त्या व्यक्ती मग तुमच्याकडे पाठ फिरवतात. पुन्हा त्यांचं काम निघेपर्यंत तुम्हाला तोंड दाखवत नाहीत. कामाची गरज लागली की लगेच तुम्हाला मेसेज करू लागतील, भेटून गोड बोलतील. तुम्ही त्यांचं काम करून द्यावं म्हणून तुम्हाला पार साखरेत घोळवून मस्का मारतील. मात्र आपण अशा लोकांपासून सावध रहायला हवे. आपण माणुसकी म्हणून मदत करायला जातो. मात्र या लोकांना त्याची किंमत नसते. अशी लोक तुमच्या मदतीकडे माणुसकी म्हणून बघत नाहीत तर चतुराईने आपले काम करून घेतात.
कामापुरते जवळ येणाऱ्या लोकांना सर्वात आधी ओळखायला शिका. ते केव्हा तुमच्याशी बोलतात, कसे बोलतात, काम नसल्यावर त्यांची तुमच्याशी वर्तणूक कशी असते याचे निरीक्षण करा. सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे काही काम घेऊन जाता तेव्हा ते तुमचे काम करतात का याचा विचार करा. मग अशा लोकांना तुम्ही स्पष्ट उत्तर द्यायलाच हवे. "मी काही रिकामी  नाही. उठ-सुठ तू माझ्याकडे येतोस कामासाठी. जेव्हा माझी वेळ येते तेव्हा मात्र उपकार विसरून जातोस. तुमच्या सारख्या लोकांना लांब ठेवलेलं कधीही बरं." असं तुम्ही नक्कीच बोलू शकता.
लोकं काम साधण्यापुरते जवळ येत असतील तर त्यांना त्यांची चूक दाखवणे गरजेचे आहे. आपण त्यांच्यासाठी रिकामे नाही याची जाणीव त्यांना व्हायला हवी. "तू मला सतत गृहीत धरत जाऊ नकोस. माझ्या उपयोगी कधी पडत नाहीस. उलट माझ्याकडून नेहमी मदतीची अपेक्षा असते. इथून पुढे कामापुरतं माझ्या जवळ यायचं नाही." असं ठणकावून सांगितल्यानंतर तुम्हाला ते लोक कधीच गृहीत धरणार नाहीत आणि तुमचा फायदा घेणार नाहीत.
शेजारच्या काकू आपल्याकडे एक वाटी साखर मागायला येतात. आई जेव्हा त्यांच्याकडे कढीपत्त्याच्या दोन कांड्या मागायला गेली तर सरळ संपल्या हो म्हणून माघारी पाठवतात. ऑफिसमध्ये सुद्धा गोड बोलून काम साधणारे लोक खूप असतात. अशा लोकांना वेळीच सडेतोड उत्तर दिले नाही तर त्यांचं फोफावू लागतं. शिवाय आपली किंमत समोरच्या माणसाला कळू देण्यासाठी त्यांना बोलणे आवश्यक असते. यासाठी लेखात सांगितल्याप्रमाणे तुम्ही कामापुरतं जवळ येणाऱ्या लोकांना स्पष्टपणे उत्तरं देऊ शकता.